Pune News : शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलकडून अनुदानित बसपास वितरण सुरु  

एमपीसी न्यूज – शालेय विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) अनुदानित बसपास पास वितरण सुरु करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. 5 वी ते 10 वी तसेच पुणे मनपा शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता सन 2021-2022 शैक्षणिक वर्षाकरिता पुणे मनपा अनुदानित बसपास वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे.

अनुदानित बस पासेससाठी शनिवारपासून  (दि.20) अर्जाचे वाटप करण्यात येत आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येणार आहे. तसेच महामंडळाच्या सर्व पास वरून सुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येईल.

महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांनी शाळेकडील विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनान्वये पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेस वितरण व्यवस्था शनिवारपासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झालेली आहे.

पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.