Chinchwad News : कष्टकरी महासंघातर्फे संविधानाच्या प्रतीचे आणि प्रास्ताविकेचे वाटप

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, फेरीवाला क्रांती महासंघ व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महासंघातर्फे कष्टकरी कामगारांना व नागरिकांना संविधानाच्या प्रतीचे आणि प्रास्ताविकेचे वाटप गुरुवारपासून सुरु केले.पुढील चार दिवस हे अभियान राबवण्यात येणार आहे.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, दिनेश लोखंडे, राजेंद्र कदम,ओमप्रकाश मोरया, हरी भोई, सुशेन खरात, सागर बोराडे, सहादेव होनमाने, रफिक गोलंदाज, मनोज कदम, फरीद शेख  आदी उपस्थित होते.

नखाते म्हणाले, क्रांतीदिनी महात्मा गांधी यांनी ‘चलेजाव’ ची घोषणा केली आणि भारत मातेच्या जयजयकारात ब्रिटिश सत्ता उलटून टाकुन स्वातंत्र्यदिनाच्या यशाचे वाटेकरी क्रांतिकारी व सर्व देशभक्त आहेत.स्वातंत्र्य दिनाची 75 वर्षे आणि क्रांती दिनाची 80 वर्षे साजरी करीत असताना आम्हाला आनंद होत आहे. तिरंगा वर्षानुवर्षे आपण फडकवतच आहोत मात्र आजच्या स्थितीत संविधानिक मूल्यांना अधिक बळकटी देण्यासाठी ‘हर घर संविधान’ महत्वाचे आहे.

सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दुरावस्थेने आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंद हिरावून घेतला जात आहे.स्वातंत्र्यानंतर शपथ घेऊन भारत हा संविधानिक मूल्यांवर उभा करण्याची जिद्द आपण ठेवली, मात्र आजमितीला संविधानिक मूल्यांना धाब्यावर बसवून एक प्रकारची एकाधिकारशाही सर्वत्र अनुभवायला मिळते, ही आपली शोकांतिका आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रध्वज तिरंगा याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहेच,मात्र भारतीय संविधान आपणा सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, बेरोजगारी, दांभिक राष्ट्रवाद, लोकशाहीची गळचेपी यामुळे देशातील जनता पिचलेली आहे.केवळ भारतीय संविधान हे समता, बंधुता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोलाचा ठरणार आहे, असेही नखाते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.