Pune : एक हजार शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन आवश्यक वस्तू तसेच शालेय साहित्याचे वाटप

रोटरी क्लबचा समाजोपयोगी उपक्रम

एमपीसी न्यूज – मावळ, मुळशी आणि खालापूर या तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब, गरजू आणि आदिवासी समाजातील एक हजार विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तू तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. लोणावळा रोटरी क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम पार पडला.
कॅनडा या देशातील स्क्रॉ स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड या स्वयंसेवी संस्थेने रोटरी क्लब, पुणे 3131 मधील लोणावळा रोटरी क्लबसह 16 क्लबच्या सहकार्याने वरील उपक्रम लोणावळा शहरात घेतला. अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रात एकूण आठ ठिकाणी घेण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे एकूण 8000 विद्यार्थ्यांना मदत दिली जात आहे. विद्यार्थ्यांना मदत म्हणून जे किट देण्यात येत आहे त्यात दोन ब्लँकेट, सतरंजी, चादर, बेडशीट, मच्छरदाणी, उशी, दोन नाईट ड्रेस, दोन टीशर्ट, दोन पॅन्ट, बूट, मोजे, स्वेटर याशिवाय शालेय साहित्यात स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, रंगाचे साहित्य यासारख्या एकूण 39 वस्तूंचा समावेश आहे.

नगरपरिषदेच्या पुरंदरे क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या या उपक्रमाला लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगरसेविका जयश्री काळे, प्रकाश काळे, रमेशचंद्र नय्यर, रोटरी क्लब लोणावळा अध्यक्ष उदय पाटील, प्रोजेक्ट डायरेक्टर गोरख चौधरी, जसवंत नलावडे, रवी कुलकर्णी, पुंडलिक वानखेडे, नारायण शरावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. रोटरी क्लब ऑफ लोणावळा, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ पुणे, रोटरी क्लब ऑफ शनिवार वाडा आणि रोटरी क्लब ऑफ काँटोमेन्ट यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.