Green Factory Award : पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘ग्रीन फॅक्टरी ‘ पुरस्कारांचे वितरण; पर्यावरण स्नेही उद्योग, कंपन्यांना गौरव

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रीन फॅक्टरी’ पुरस्कारांचे (Green Factory Award) वितरण पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच शनिवारी (दि. 4 जून) सायंकाळी 6 वाजता गांधी भवन,कोथरूड येथे पार पडला. के.के. नाग प्रा.लि., आयसीआयसीआय,भाटे-राजे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण स्नेही उद्योग, कंपन्यांना यावेळी गौरविण्यात आले.

याप्रसंगी हारनेक्स सिस्टिम्स, टी.बी.के. इंडिया आणि देशमुख उद्योग प्रा. लि. या तीन कंपन्यांना पर्यावरण पूरक उत्कृष्ट निसर्ग संवर्धन कार्य करीत असल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांच्या वतीने’ ग्रीन फॅक्टरी’ (Green Factory Award) पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक करंदीकर, रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 चे नियोजित प्रांतपाल शीतल शहा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लघु अणि मध्यम उद्योगांसाठी पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष मनीष धोत्रे, सचिव अनिकेत साळुंखे, प्रकल्प समन्वयक केशव ताम्हनकर उपस्थित होते.

Todays Horoscope 06 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

या कार्यक्रमात पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले. प्रास्ताविक केशव ताम्हणकर यांनी तर सूत्रसंचालन शुभदा ताम्हणकर यांनी केले. विकास भुरे, बिल्वा खळदकर आणि विश्वास लेले यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केले.

आपल्या पूर्वजांनी इमानेइतबारे आणि दूरदृष्टीने निसर्ग संवर्धन करून चांगले पर्यावरण आपल्यापर्यंत पोहोचवले पण प्रगतीच्या आणि विकासाच्या चुकीच्या कल्पनांमुळे आपल्या पिढीने , पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याचे, निसर्ग उध्वस्त करण्याचे जे काम चालविले आहे, ते वेळीच थांबवून अधिकाधिक पर्यावरण पूरक आणि निसर्ग संवर्धनाचे काम हाती घेऊन, ही एक मोठी लोकचळवळ उभी करायची गरज आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, सरकारवर आणि सरकारी योजनांवर अधिक अवलंबून न राहता मराठा चेंबर च्या पुढाकाराने आम्ही सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणात हाती घेतला आहे, सूर्य हा वीजनिर्मिती साठी महत्त्वाचा स्रोत आहे, त्याचा उपयोग सर्वच मोठ्या कंपन्यांनी करून घेतल्यास अधिकाधिक वीजनिर्मिती होऊन निसर्ग रक्षण होऊ शकते.

सरकारी योजना आणि निसर्ग संवर्धन, पर्यावरण रक्षण, सौरऊर्जा आदी बाबत असणार्या उद्योग जगताच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मैत्री सेल’ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख पाहुणे सदाशिव सुरवसे यांनी यावेळी दिली.

छोट्या व लघु उद्योग धंद्यात वाढ होण्यासाठी त्यांना नवीन तंत्रज्ञान, पेटंट रजिस्ट्रेशन, वाॅटर कन्झर्वैशन, सबसिडी तरतूद अशा अनेकविध सुविधा शासन देत असून ज्या द्वारे स्थानिक पातळीवर उद्योग धंद्यांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल याकडे शासनाचे अधिक लक्ष असते, असेही सुरवसे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.