Vadgaon Maval News : शेती सहकारी विकास सोसायटी यांच्यामार्फत खरीप पीक कर्जाचे वाटप सुरू

एमपीसी न्यूज  – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तालुक्यातील शेती सहकारी विकास सोसायटी यांच्यामार्फत खरीप पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या वर्षी आत्तापर्यंत 5 हजार 600 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयाचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपतराव भानुसघरे यांनी दिली.

मावळ तालुका हा खरीप पिके उत्पादन करणारा प्रमुख तालुका असून  खरीप भात पिकाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या तालुक्‍यात 13 हजार हेक्‍टर क्षेत्रफळामध्ये खरीप भात पीक घेतले जाते. यासाठी गावपातळीवरील शेती विकास सोसायटी यांच्यामार्फत खरीप पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे, खते, औषधे यासाठी खरीप पीक कर्ज दिले जाते.

मावळ तालुक्यातील सुमारे दोनशे गावामधील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 55 हजार रुपयाचे कर्ज सोसायटी यांच्यामार्फत पुरवले जाते. यावर्षी मावळातील 55 शेती विकास सोसायट्यांनी एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटप सुरू केले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट कर्ज मंजूर रकमा जमा केलेल्या असल्याचे श्री भानुसघरे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 11 शाखा असून तालुक्‍यातील 55 विकास सोसायटी यांच्या मार्फत आतापर्यंत 5 हजार 600 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळ विभागाचे प्रमुख गुलाबराव खांदवे यांचे मार्गदर्शनाखाली खरीप पीक कर्ज वाटप सुरू असून खरीप पीक कर्ज वाटपाचे काम शेती विकास सोसायट्यां करीत असल्याचे तळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मराठे यांनी यावेळी  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.