Pune : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली आपदग्रस्तांची भेट

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शिरुर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतमालाची आणि पडझड झालेल्या घरांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसिलदार एल.डी.शेख व अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

शिरुर तालुक्यातील चांडोह गावामध्ये अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी जिल्हाधिकारी राम यांनी केली. यावेळी त्यांनी आपदग्रस्त अंकुश गणपत शिंदे या शेतक-याची विचारपूस केली व नुकसानीबाबत मदतीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रांताधिका-यांना दिल्या.

यानंतर पाबळ येथील चौधरवस्ती येथे प्रवीण चौधरी यांच्या शेतातील गोल्डन मका पिकाच्या नुकसानीबाबत तसेच खैरेनगर येथील शेतकरी रघुनाथ शिंदे यांच्या अतिवृष्टीने बाधित द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले की, शेतीमालाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरु झाली आहे. एकत्रित अहवाल शासनास पाठवून आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्याची कार्यवाही करुण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.