Divyasvatantryavi : ‘दिव्यस्वातंत्र्यरवि : एक दिव्य अनुभूती’

एमपीसी न्यूज : ‘तारिणी नव वसन धारिणी’, ‘शूरा मी वंदिले’, ‘माता वचन दे सदा’, ‘जो लोककल्याण साधावया जाण’, ‘आपदा राजपदा’, ‘माता दिसली समरी विहरत’ या आणि अशा वीररस उत्पन्न करणाऱ्या अन्‌‍ देशभक्ती जागृत करणाऱ्या नाट्यपदांनी स्वातंत्र्य संग्रामातील संगीत रंगभूमीने दिलेल्या राष्ट्रकार्याच्या योगदानाची प्रचिती आली ती ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ (Divyasvatantryavi) या अनोख्या कार्यक्रमातून.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संगीतनाट्य रंगभूमीचेही मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात किर्लोस्कर, खाडिलकर, सावरकर, देवल अशा अनेक सिद्धहस्त लेखकांनी आपल्या लेखणीतून स्वातंत्र्यसंग्रामासाठी शब्दांचे निखारे धगधगत ठेवले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ज्येष्ठ गायिका अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ या लक्षवेधी, अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस
फाउंडेशन यांच्यातर्फे कलामंजिरी प्रस्तुत हा कार्यक्रम भारतीय विद्या भवन येथे सादर करण्यात आला. सुरुवातीस भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत स्वयंवर या नाटकातील ‘धीर वीर पुरुषपदा नमन असो’ या पराक्रमी श्रीकृष्णाला वंदन करणाऱ्या नांदीने झाली. शूरवीर सेनापती धैर्यधराला देवीचे दर्शन झाल्यानंतर त्याच्यात जागृत झालेल्या वीररसाची अनुभूती देणाऱ्या ‘माता दिसली समरी विहरत’ हे संगीत मानापमानमधील पद सादर करण्यात आले.

Poetry Publication: कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

इंग्रजांच्या तावडीतून 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला असे आपण म्हणतो पण त्या आधीही आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. त्यामुळे देशात पारतंत्र्याचीच स्थिती होती. देश पारतंत्र्यात असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नव्हतेच. अशा परिस्थितीत त्या काळातील नाटककार खाडिलकर, देवल, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, वसंत शांताराम देसाई, आचार्य अत्रे, य. ना. टिपणीस, गोविंदराव टेंबे यांच्यासह अनेक नाट्यसंस्था, कलावंत आणि संगीत दिग्दर्शक यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान विविध नाट्यपदे, नाट्यप्रवेशांद्वारे दर्शविणाऱ्यात आले. कार्यक्रमाचा समारोप मधुवंती दांडेकर यांनी ‘रण दुंदुभी’ या नाटकातील ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ (Divyasvatantryavi) या पदाने केला.

कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि संगीत मार्गदर्शन तसेच अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मधुवंती दांडेकर यांचे आहे. मधुवंती दांडेकर आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी ओघवत्या शैलीत विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. गायक अभिनेते चिन्मय जोगळेकर आणि युवा गायिका पूर्णा दांडेकर यांनी नाट्यपदे सादर केली तर गंधार दांडेकर यांने आचार्य अत्रे यांच्या वंदे भारतम्‌‍मधील प्रवेश सादर केला. संजय गोगटे (ऑर्गन) आणि विद्यानंद देशपांडे (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.