सेलिब्रिटीजची दिवाळी

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरलेला सण. तुमु- आम्ही दिवाळी साजरी करतोच. पण वर्षभर आपले मनोरंजन करणारे कलाकार दिवाळी कशी साजरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. दिवाळी सणाची त्यांच्या दृष्टीने नेमकी काय कल्पना आहे हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात.

अरुण नलावडे

दिवाळी हा सण सर्वानाच आवडतो, चार दिवस सगळीकडे दिव्याची आरास, पणत्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघालेला असतो, आम्ही पूर्वी जेथे रहात होतो ती कॉलनी होती, तेथे एकत्र फटाके वाजविण्याचा कार्यक्रम असायचा. त्यानंतर आम्ही बोरीवली येथे राहायला आलो, तेथे सोसायटी मध्ये दिवाळी साजरी करायला सुरवात झाली. पहिल्या दिवशी उटणे लाऊन अभ्यंगस्नान, मग फराळ इत्यादी कार्यक्रमास सर्व एकत्र बसून करीत असू, बालपणात बिल्डींग मध्ये आकाश कंदील करून लावण्यासाठी आमचा उत्साह असायचा, खूप मजा यायची, दिवाळीत आम्ही ग्रुपने फटाके वाजवीत असायचो, मोठा कार्यक्रम असायचा, पण एका दिवाळीला लहानपणीच फटाके वाजवताना आमच्याच वयाच्या मुलाच्या चेहऱ्यावर फटाका फुटला त्यामुळे त्याचा डोळा गेला त्या दिवसापासून मी धसका घेतला. त्या दिवसापासून मी फटाके वाजवणे बंद केले. त्यादिवशी दिवाळीचा आनंद मला घेता आला नाही.

फटाक्यामुळे होणारे वायूचे आणि ध्वनीचे प्रदूषण मला लहानपणीच्या अपघाताच्या दिवसानंतर कळायला लागले. फटाक्याने तान्ह्या मुलांना, वयोवृद्ध माणसांना होणारा त्रास जाणवू लागला, त्यानंतर आम्ही “ फटाके वाजवू नका – ध्वनी प्रदूषण / वायू प्रदूषण होते त्यामुळे फटाके नको “ असा प्रचार करायला सुरवात केली, दिवाळी एकमेकांना शुभेच्छा देऊन, कंदील लाऊन, फराळ करून – साजरी करता येते, त्यामधून आनंद घेता येऊ शकतो. मला कोणी फटाके वाजवलेले आवडत नाहीत, आज सर्वत्र प्रदूषण झालेलं आहे त्यामध्ये आपण वावरतोय त्यामध्येच फटाक्याचा जल्लोष नको, कोणी मोठी व्यक्ती आली कि फटाके फोडायची सवय जी लागलेली आहे त्याने प्रदूषण वाढते याची जाणीव ठेवायला हवी. ते आरोग्याला घातक आहे, ह्याचा विचार करायला हवा, असे असले तरी काही ठिकाणी लोक जागृत झाले आहेत, आता पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी फटाके वाजवतात, मी बारा वर्षाच्या असतांना आईला फराळाला मदत करीत असे, चकलीची भाजणी, पिठाच्या गिरणीतून आणून देत असे, करंजी बनवायला मदत केली आहे, मला पणत्याची आरास करायला आवडते, चकली हा माझा आवडता पदार्थ आहे. दिवाळीच्या गाठी-भेटी घेताना आम्ही फराळाबरोबर पुस्तके भेट देतो. सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ,,

शशांक केतकर

चार- पाच दिवस चालणारा अत्यंत मोठा आणि महत्वाचा सण दिवाळी हा आहे. आयुष्य प्रकाशमय करणारा हा सण असून लक्ष्मी पूजन, भाऊबीज ह्या विषयीच्या छान आठवणी आहेत. मला धाकटी बहीण आहे, त्यामुळे हा सण उत्साहात साजरा होतो. माझी बहीण दीक्षा ही अमेरिकेला असल्याने आमची तशी भेट होत नाही, आता मी बिजनेसमध्ये असल्याने तेथे लक्ष्मी पूजन वेगळे होते आणि घरी वेगळे होते. फराळ मला खूप आवडतो, पण आता डायेटमुळे सगळ्या गोष्टी खाता येत नाहीत. आई जेंव्हा रवा, पोहे फराळासाठी भाजत असते त्यावेळी मी वासाने ओळखायचो कि आई आता काय बनवीत आहे.

ह्या वर्षी माझी बहीण भारतात येणार आहे त्यामुळे भाऊबीज उत्साहात होणार हे नक्की. त्याच बरोबर आता माझ्या सोबत प्रियांका आहे. पुन्हा एकदा आमचा कौटुंबिक सोहळा साजरा होईल. बालपणी आम्ही आमच्या बंगल्याच्या जेवढ्या बालकन्या आहेत त्या ठिकाणी आम्ही लहान लहान कंदील घरी तयार करून लावायचो. आणि हे कंदील आम्ही ३१ डिसेंबर पर्यंत ठेवतो. मी १९९४ पासून फटके उडवणे सोडून दिले. फटक्यामुळे फायदा काहीच होत नाही फक्त ध्वनिप्रदूषण मात्र होते. पैसा खर्च होतो. आणि फटक्याच्या आवाजाने शेजारी-पाजारी लोकांना त्रास होतो आजारी माणसाना त्रास होते ह्याचा विचार केला गेला पाहिजे. समाज आणि निसर्ग ह्याचा विचार करून सण साजरे केले पाहिजेत. फराळ करा, आकाश कंदील करा, किल्ले तयार करा, असा उत्तम सण साजरा करावा. माझा आवडीचा पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू, तिखट शंकरपाळे, चकली, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा….

विनय येडेकर

दिवाळी म्हणजे माझा आवडता – लाडका सण आहे. लहानपणी शाळेला दिवाळीची सुट्टी असायची, त्यावेळी खरच खूप धमाल केलेली आहे. शाळेमधून दिवाळीसाठी सुट्टीच्या काळात “ होमवर्क “ दिलेला असायचा, आणि ती होमवर्क ची वही सजवून शाळेत द्यायची, त्याला मार्क असायचे, सुरवातीला सुट्टी लागल्या बरोबर सगळा होमवर्क संपूर्ण करून टाकायचा. वही छानपैकी सजवायची आणि मग दिवाळीची धमाल करायला तयार असायचो. मी माहीम येथे राहतो, त्यावेळी मोठी चौपाटी होती, त्या चौपाटीवर जाऊन वाळूचे किल्ले करीत असू, आणि शेवटी किल्ला मोडायच्या वेळेला त्यामध्ये फटके ठेवायचे आणि ते वाजवायचे… त्या तिथे आम्ही घरचा फराळ घेऊन जात असू, आत्ताच्या पिढीला हि गंमत अनुभवायला मिळत नाही. आजकाल सगळे “ मोबाईल “ मध्ये अडकलेले आहेत, खरी दिवाळी साजरी करायचा आनंद घ्यायला मिळत नाही. माझी आई सुरेख फराळ करते, त्यामध्ये खाजाच्या करंज्या ह्या खास असायच्या, त्यासाठी मेहनत खूप करावी लागते. आता काळानुसार बदलायला हवे. ध्वनी प्रदूषण याचा सगळ्यांना त्रास होतो, ह्याची जाणीव ठेवायला हवी. पूर्वी मोकळी मैदाने होती आता टॉवर आले, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. फाटकाच्या आवाजांनी वयस्कर लोकांना, आजारी लोकांना त्रास होतो हे लक्षांत ठेवायला हवे. असे माझे सगळ्यांना कळकळीचे सांगणे आहे. माझा आवडता पदार्थ म्हणजे चकली / करंजी, सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा…..

इरावती लागू

दिवाळी हा आनंद उत्सव आहे. तसाच तो दिव्यांचा उत्सव आहे, लहानपणी नरकचतुर्दशी दिवशी सकाळी आई मला लवकर उठवायची, अभ्यंगस्नान व्हायचे, त्यावेळी ती “ भीती “ घालायची, लवकर उठा नाहीतर नरकात जाल, आता नरक म्हणजे काय हे एक दिवस मला माझ्या मुलांनी विचारले, त्याला सांगितले की “ जी वाईट चालीचे मुले / लोक असतात ते तेथे जातात, आणि देवानी एक डायरी ठेवलेली असते त्यामध्ये तो सगळे नोंद करतो, आणि त्याप्रमाणे वागतो. आपण चांगले वागायला हवे. सर्वाना मदत करायला पाहिजे. हा एक संस्कार आपण दिवाळीच्या माध्यमातून मुलांना शिकवू शकतो. आजच्या पिढीला संस्काराची गरज आहे. भाऊबीज ची आमच्या कडे एक प्रथा आहे, आम्ही सगळे भाऊ-बहिणी एकत्र येतो, आणि ओवाळण्याचा कार्यक्रम हा उत्साहाने दोन तास चालतो, त्यामध्ये सर्वजण एकत्र येतात हा त्यातला मोठा उद्देश आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा उत्साहाने केली जाते. मी दररोज संध्याकाळी तुळशी वृंदावनापाशी पणती लावते, आणि मुलाला घेऊन “ शुभंकरोती “ म्हणते, ह्या शिवाय संस्कार भारतीची रांगोळी काढते. मी बालपणी दिवाळीचा सण आनंदाने साजरा केला आहे आमचा बंगला होता, त्यामुळे तेथे पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे, हे उत्साहाने व्हायचे, दिवाळी म्हणजे दीप उत्सव आहे आम्ही बालपणी माझ्या आजोळी म्हणजे नागपूर जवळ भडगाव आहे तेथे जायचो, तेथे भाऊबीज साजरी व्हायची. आता गेले दोन / तीन वर्षे पासून मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम सुरु केला आहे.

आम्ही अनाथ आश्रमात जातो, कुठेही असला तरी आम्ही जातो, तेथे मुलांना नवीन कपडे, आणि फराळ, खाऊ असे प्रत्येकला देतो, त्यांच्या बरोबर राहून दिवाळी साजरी करतो. आता आमच्या बरोबर मुलाला घेऊन जातो. आजकाल फाटक्या मुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे फटाके पेक्षा फराळ, कपडे, पुस्तके आणून दिवाळी साजरी करू या. मी मुलांच्या वाढदिवसाला पुस्तके देते, माझा आवडीचा पदार्थ चिवडा / चकली आहे, तसे सगळेच पदार्थ मला आवडतात, माझ्या सासूबाई चकली अप्रतिम बनवतात. सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

संतोष पवार

सर्वप्रथम सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…. दिवाळी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा सण आहे. दिवाळीचे चार दिवस आपणाला जगावे कसे हे शिकवून जातात, लहानपणा पासून आम्ही दिवाळी साजरी तुळशी च्या लग्नापर्यंत करायचो. मला फटाके आवडत नाहीत. मी रांगोळी खूप सुंदर काढतो, मी पोलीस लाईन मध्ये राहायचो, अर्धा अधिक बिल्डींग मध्ये मी रांगोळी काढायचो, नरकचतुर्दशी च्या दिवशी आईच्या हातून अभ्यंगस्नान व्हायचे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा उत्साहाने घरी करतो, मला तीन बहिणी आहेत त्यामुळे भाऊबीज उत्साहाने साजरी व्हायची, रांगोळी बरोबर मी आकाश कंदील करायचो, दर दिवाळीला कोणत्या आकाराचा आकाश कंदील करायचा ह्याची योजना आधीच ठरवली जायची. दिवाळी हा सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे, दिवाळीच्या उत्सवामध्ये “ गोविंदा / नवरात्र “ किंवा इतर उत्सवाप्रमाणे कमर्शियल पणा आलेला नाही हे खूप चांगल आहे.

आनंदा कारेकर

मी गिरगाव मध्ये राहिलो असल्याने तेथे प्रत्येक सण हा उत्साहाने साजरे होतात. त्यामध्ये लक्ष्मी पूजन, भाऊबीज हे मोठया उत्साहाने साजरी होते. नवीन कपडे, आकाश कंदिलाने सजलेल्या गिरगाव मधील चाळी आणि आता बिल्डींग ह्या खूप छान दिसतात. माझ्या घरी माझ्या मावस / चुलत बहिणी येतात आणि घरी मोठया उत्साहाने भाऊबीज साजरी होते. बालपण गिरगाव मध्येच गेले असल्याने त्याकाळी फटाके उडवणे व्हायचे, पण त्यात कमी आवाज करणारे फटाके अधिक असायचे, फुलबाज्या, सुदर्शन चक्र, अनार, आणि लहान फटाके यांचा समावेश असायचा. मी चौथी पासून आकाश कंदील करतोय, शाळे मध्ये असतांना आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा होती त्यामध्ये मला पहिले बक्षीस मिळाले होते. आज फटाके वाजवताना ध्वनी प्रदूषणाचा विचार करायला हवा. दिवाळी मध्ये एकात्मकता टिकून रहाते, मला चकली हा पदार्थ फार आवडतो, सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.