Nashik Crime News : लग्नसराईत चोरट्यांची दिवाळी; शहरातील दोन घटनांत सव्वातीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

एमपीसीन्यूज : सध्या लग्नसराईने जोर धरला असून या संधीचे खरेखुरे ‘सोने’ करत चोरट्यांनी दिवाळी साजरी केली आहे. शहरातील विविध दोन घटनांमध्ये सव्वा तीन लाखांचे सोने अज्ञात चोरट्यांनी लुबाडले आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लग्न समारंभासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तब्बल 2 लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागीने ओरबाडून नेल्याप्रकरणी वैभवी विश्वनाथ शेळके (रा. निर्मला कॉन्व्हेन्ट रोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10 ) सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी वैभवी या लग्न समारंभासाठी औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे जात होत्या.

यावेळी जनार्दन स्वामी मंदिराच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या कडेला त्या उभ्या असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातीलपाच तोळे वजनाची सोन्याची पोत, सोन्याची चेन, गंठण असा एकूण 2 लाख 45  हजार रुपये किंमतीचे दागीने ओरबाडून नेले. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक पवार तपास करत आहे.

दुसरी घटना इंदिरानगर बोगद्याजवळ घडली. याप्रकरणी ज्योती शिवाजी बडे (रा. कामटवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी ज्योती या पतीसोबत इंदिरानगर जॉगिग ट्रक येथे उभ्या होत्या.

यावेळी पाठिमागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक गेगंजे तपास करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.