Chinchwad: बाल कलाकरांचे गायन-वादनातून रसिकांना अनोखे ‘दिवाळी गिफ्ट’!

एमपीसी न्यूज –  अभंगांतून भक्तीरसाची अनुभूती, नाट्यगीतांची पर्वणी, लावणीचा नखरेलपणा अन् शास्त्रीय नृत्याविष्कार, तबला आणि बासरीची जुगलबंदी असा अनोखा मिलाफ बाल कलाकारांच्या सादरीकरणातून पिंपरी-चिंचवडमधील रसिकांनी शनिवारी अनुभवला. रसिकांच्या उदंड प्रतिसादाने तब्बल चार तास रंगलेला हा अनोखा सोहळा प्रकाश पर्वाबरोबरच दिवाळीची गोडी वाढविणारा ठरला.

निमित्त होते ते समर्थ प्रॉडक्शन आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा या कार्यक्रमाचे. बालकलाकारांचे सुरेल आणि रंगतदार सादरीकरण, रसिकांची मिळत गेलेली दिलखुलास दाद या मुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.  या कार्यक्रमात चैतन्य देवढे, अंशिका चोणकर, अभिषेक कांबळे, अंजली गायकवाड, ऋचा पाटील आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी या कलाकारांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात भूपाळीने झाली. ‘उठी श्रीरामा’, ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘सूर निरागस हो’, ‘देवा तुझ्या नावाचं रं’, ‘कांदे पोहे’, ‘दिल की तपीश’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’, ‘राती अर्ध्या राती’, ‘होठों पे ऐसी बात’, ‘घर मोरे परदेसीया’ अशी एकाहून एक लोकप्रिय गीते  कलाकारांनी सादर केली. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ आणि ‘इंद्रायणी काठी’ या अभंगांनी पंडित भीमसेन जोशी यांची आठवण तर झालीच पण रसिकांना भक्तीरसाची अनुभूतीही आली. संगीत संयोजन शामजी गोराणे यांनी केले.
मानस ग्रुपचे संजय नरोडे तसेच रोहिदास गाडे, सोपानशेठ बेल्हेकर, मेजर निशांत जोशी यांची विशेष उपस्थिती होती. कलाकारांचा तसेच मान्यवरांचा सत्कार रमा पाटील, श्रीकृष्ण अभ्यंकर, सचिन चपळगावकर, मृणाल चपळगावकर, राजीव पाटील, रणजीत जाधव, शीतल कापसीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.