Talegaon : गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव मंडळांनी जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. गणेशोत्सव मंडळाने नियमानुसार वीज जोडणी घ्यावी. गणेशोत्सव मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दर्शनासाठी महिला व पुरुष रांगा वेगळ्या करा. अग्निशमन यंत्र उपलब्ध ठेवा, देखाव्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. वर्गणी घेताना जबरदस्ती करू नका खंडणीचे गुन्हे दाखल होतील. असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले.

येथील योगीराज कार्यालयात सोमवार (दि.२६) सायंकाळी ७ वा. आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीत ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. याप्रसंगी नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेवक अमोल शेटे, अरुण माने, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, महिला दक्षता समिती अध्यक्ष रजनी ठाकूर, शिरगाव परंदवडी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस कर्मचारी प्रशांत वाबळे, युवराज वाघमारे, राकेश पालांडे, गणेशोत्सव मंडळाचे, विविध समिती व संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे पुढे म्हणाले जे गणेशोत्सव मंडळ गणपती बसविणार आहेत त्यांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन फॉर्म भरनेही सुरू झाले आहे, यामध्ये नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडळांचा स्टेज भक्कम असावा, विद्युत तारा या वरती खांबांना बांधलेल्या असाव्यात, पारंपारिक वाद्ये वाजवूनच गणपतीची मिरवणूक व विसर्जन करावे. गणपती मंडळामध्ये मंडळाचे कार्यकर्ते हजर असावेत, अधिक माहितीसाठी गणपती मंडळ आणि पोलिसांचा व्हाट्सएप ग्रुप तयार केला जाईल. कोणत्या मंडळाला काही समस्या असेल तर त्यांनी ती ग्रुपवर टाकल्यास लगेच समस्येचे निवारण केले जाईल. शेवटच्या दिवशी मानाच्या गणपतीच्या मिरवणुका लवकरात लवकर काढाव्या. २४ तास मंडळांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस वाहन कार्यरत असेल.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अरुण माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन आणि महत्वाच्या सूचना सांगितल्या. वीज मंडळाचे उप कार्यकरी अभियंता राजेंद्र गोरे यांनी गणेश मंडळांना वीज पुरवठा विषयी माहिती दिली यामध्ये मंडळांनी इतर कोणत्याही ठिकाणाहून वीज न घेता स्वतः मंडळाचे कनेक्शन घेण्यास सांगितले यावेळी ही वीज सर्व मंडळांना अल्पदरात असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.