Pune News: बाधित शेतीक्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

परतीच्या मॉन्सून पावसामुळं जिल्ह्यातील खरीप शेतीचं अतोनात नुकसान

एमपीसी न्यूज –  परतीच्या मॉन्सून पावसाचा जबरदस्त तडाखा पुणे जिल्ह्यातील दौंड, मुळशी, जुन्नर, इंदापूर आणि बारामती येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाचं पाणी शेतजमिनीत घुसल्यामुळं हाताशी आलेल्या खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर बाधितक्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 
पुणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने बुधवारी हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेततळी, नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत.
पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहर आणि जिल्ह्यात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. ग्रामीण भागातील दौंड, मुळशी, जुन्नर, इंदापूर, बारामती तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दौंड आणि इंदापूर तालुक्यातील ऊस, भातशेती, कांदा, पालेभाज्या आणि फळभाज्या वाहून गेली. जोरदार पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने ग्रामीण भागातील विद्यूत पुरवठा देखील खंडीत झाला आहे.
एकंदरीत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या शनिवारपर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले.

 

खडकवासला धरणातून 3,420 क्युसेक विसर्ग
खडकवासला धरणसाखळीतून मुठा नदीपात्रात तीन हजार 420 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या उपनगर आणि गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागातर्फे देण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थान विभागाने अतिसंवेदनशिल ठिकाणी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.