Pimpri: ‘डीपी’, आरक्षित जागांवरील अनधिकृत बांधकामे पाडा; अन्यथा कारवाई करणार – महापौर जाधव

महापौर राहुल जाधव यांचा अधिका-यांना इशारा 

एमपीसी न्यूज – विकास आराखडा (डीपी), आरक्षणे विकसित केल्याशिवाय शहराचा संपूर्ण विकास होणार नाही. शहर सुटसुटीत वाटणार नाही. यामुळे शहाराचा अर्धवट विकास राहतो. त्यासाठी ‘डीपी’, आरक्षित जागांवरील अनधिकृत बांधकामे त्वरित पाडण्यात यावी. अन्यथा अधिका-यांवर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील टप-यांवर कारवाई करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. 

पत्रकारांशी बोलताना महापौर जाधव म्हणाले, ‘शहराचा श्वास कोंडला आहे. त्यामुळे विकास आराखडा, आरक्षणे विकसित करणे महत्वाचे आहे. त्यावरील अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्यात यावीत. त्यासाठी नगररचना आणि बांधकाम विभागाला आवश्यक ती मदत केली जाईल. पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. परंतु, कारवाई झाली पाहिजे. कारवाई न केल्यास अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील टप-या, शहराच्या विद्रुपीकरणात भर पडणा-या प्रत्येक गोष्टीवर कारवाई करण्यात यावी’.

‘महापालिकेचा श्रीमंत महापालिका असा लौकिक आहे. शहराच्या लौकिकात आणखीन भर पाडण्यासाठी अधिका-यांनी देखील श्रीमंत मनाचे व्हावे. जबाबदारीची जाण ठेऊन आपली भूमिका चोकपणे पार पाडावी. शहर विकासात भर पाडावी. विकास आराखडा, ड्रेनजची कामे वेळेत मार्गी लावावीत’, असेही महापौर जाधव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.