Lonavala : लोणावळ्यात दोनदा द्यावा लागतो टोल? नागरिक पुन्हा जाणार संपावर

एमपीसी न्यूज : सोमाटणे टोल बुथप्रमाणेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या इंटरचेंजजवळील (Lonavala) वळवण गावच्या कुसगाव टोल बुथवरही बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरू असून, वाहनांकडून दोनदा टोल वसूल केला जात आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोल नाक्यावर टोल भरल्यानंतर, लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश निषिद्ध असल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने वळवण येथून एक्स्प्रेस वेवर जातात. मात्र, एक्स्प्रेस वेवर प्रवेश करताच या वाहनांकडून पुन्हा टोल वसूल केला जातो.

2020-21 पर्यंत कुसगाव टोल बूथवर वाहनांना एकच टोल पावती आकारली जात होती, तर वरसोली टोल बूथवर टोल भरणा पावती स्वीकारली जात होती. मात्र, आता दुप्पट टोल वसूल केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा शहरातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे, मात्र या अतिरिक्त टोलवसुलीमुळे त्रस्त वाहनचालक लोणावळ्यातून धोकादायक पद्धतीने वाहने वाहून नेतात.

त्यामुळे लोणावळा शहरात अनेकदा अपघात घडतात. स्थानिक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वरसोली टोल नाक्यावर टोलची पावती पूर्वीप्रमाणेच कुसगाव टोल बुथवर स्वीकारण्यात यावी, अन्यथा हे टोल बुथ कुसगाव परिसरात अधिसूचित केलेल्या ठिकाणी हलवावे; अशी मागणी ‘मी लोणावळाकर’च्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी लोणावळ्यातील नागरिकांनी गेल्या वर्षी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत आंदोलन केले होते. एमएसआरडीसी आणि आयआरबीने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे (Lonavala) मनशक्ती केंद्र ते खंडाळा बॅटरी हिल दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. या परिसरात कुठेही फूटपाथ नाही.

Pune News – ‘पुणे मिलेट’ महोत्सव उत्साहात संपन्न

वर्षभरापूर्वी एमएसआरडीसी आणि आयआरबीने नाझर कॉर्नर खंडाळा येथील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी वळण काढून रस्ता सरळ करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादित करण्यासाठी नियमानुसार पाच ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ठिकठिकाणी ब्लिंकर दिवे लावण्यात येणार होते, मात्र ते लावण्यात आलेले नाहीत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोणावळा आणि खंडाळा शहरात सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. काल सकाळी कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक आणि शाळकरी मुलगी जखमी झाली. एमएसआरडीसी आणि आयआरबीने लोणावळ्यातील नागरिकांना दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे; अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.