Pune News : डॉक्टर तरुणाची तीस लाखांनी फसवणूक

हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघांनी हडपसर येथील एका डॉक्टर तरुणाची तीस लाख दहा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी सौरभ लामतुरे (वय 26) यांनी तक्रार दिली असून आरोपी संतोष कुमार आणि शामा सर उर्फ बाबुभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणाने एमबीबीएस शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याला पदव्यूत्तर शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाईटवर अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी एका व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून एमडीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली टप्प्याटप्प्यांनी तीस लाख 10 हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले.

दरम्यान 30 लाख रुपये देऊनही एमडीच्या शिक्षणाला प्रवेश मिळत नसल्यामुळे तक्रारदार तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर आर पाटील करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.