Pimpri News : दुकाने उघडी ठेवल्यानेच कोरोना पसरतो का? व्यापाऱ्यांचा सवाल

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल्स, जीम 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. दुकाने उघडी ठेवल्यानेच कोरोना पसरतो का? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमय्या म्हणाले, अगोदरच व्यापाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्राहक कमी आहेत. व्यवसायासाठी भाड्याने घेतलेल्या दुकानाचे भाडे निघणे देखील अवघड झाले आहे. कर्ज काढून दुकान थाटले आहे.  बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाले आहे. बँका हप्त्यासाठी थांबत नाही. अशावेळी व्यापाऱ्यांनी जगायचे कसे.

वाहतूक, दोन नंबरचे व्यवसाय चालू आहेत. त्यामुळे कोरोना होत नाही फक्त दुकाने चालू राहिल्यामुळे कोरोना होतोय का, 31 मार्चला कर भरून मेटाकुटीला आला होता. व्यापाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय केला जात आहे. व्यापारी लसीकरण करून घेत आहेत. ग्राहकाला देखील लस घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे.  व्यापाऱ्यांकडून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय करणे सुरू आहे. ग्राहकांना मास्क लावणे, सोशल डिस्टंसिग ठेवणे यासारख्या सूचना वेळोवेळी व्यापाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. तरीसुध्दा दुकाने बंद ठेवण्यास लावले जाते. हा या सर्व परिस्थितीवर उपाय नाही.

पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा म्हणाले, राज्य सरकारचा नियम पाळायचा असा सध्या तरी विचार केलेला आहे. कारण, कोरोनाची रुग्णसंख्या महाभयंकर वाढत आहे. जनतेचे आरोग्य चांगले रहावे. यासाठी आठ दिवस तरी शांततेने बंद ठेवू असे व्यापाऱ्यांनी ठरवले आहे. त्यानंतर पुढची भूमिका घेतली जाईल.

पिंपरी क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू जोथवानी म्हणाले, अतिशय चुकीचा निर्णय आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे मान्य आहे. पण, शहरात हॉस्पिटल आहेत. बेडची सुविधा उपलब्ध आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. व्यापारी अगोदरच आर्थिक संकटात आहे. बेरोजगारी वाढत असून त्यामुळेच मृत्यू होतील. पुन्हा लॉकडाऊन सारखे निर्णय घेणे अतिशय चुकीचे आहे.  पुण्यात बंद आहे म्हणून आपणही बंद करण्याची आवश्यकता नाही. दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कपडा व्यापारी असोसिएशन, फुटवेअर, मोबाईल शॉपी अशा सर्वांचा  तीव्र विरोध आहे.

चिंचवड येथील कापड दुकानदार किशोर जगदाळे म्हणाले, ‘किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी. सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुकानांचे भाडे, कामगारांचे पगार आणि कर्जाचे हप्ते कसं भागवायचे असे प्रश्न व्यापा-यांसमोर आहेत. शासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.