Nigdi : यमुनानगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; एकाला घेतला चावा 

तीन महिन्यात दहा जणांना घेतला चावा

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांनी नऊ ते दहा जणांना चावा घेतला असून आज (बुधवारी) देखील एकाला चावा घेतला आहे. याबाबत ‘सारथी’ हेल्पलाईनवर तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप, स्थानिकांनी केला. 

यमुनानगर पोलीस चौकीच्या मागे देविदास लोखंडे नामक व्यक्तीला आज भटक्या कुत्र्याने चावा घेतला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. अडीच ते आठ वर्षांच्या नऊ ते दहा मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईवर अनेकदा तक्रार केली. परंतु, त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले, ‘गेल्या तीन महिन्यांपासून यमुनानगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यांचा पालिकेकडून बंदोबस्त केला जात नाही. तसेच शहरात दर दिवसाला एकाला कुत्रे चावण्याची घटना घडत आहे. कुत्रे चावल्यानंतर घेण्यासाठीची ‘रेबीज’ लस देखील उपलब्ध नाही. दिवसें-दिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय. आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाने संयुक्तिक उपक्रम घ्यावा. भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात यावी’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.