Donald Trump on Corona Deaths in India: भारतातील कोरोना बळींच्या आकड्याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणतात….

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित मृतांची संख्या भारताने लपवली असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी भारतासह चीन, रशियावरही हा आरोप केला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या अध्यक्षीय वादविवादात अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आणि मृतांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासह चीन व रशियावरही हा मोठा आरोप केला.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांनी आव्हान दिले आहे. अमेरिकेतील कोरोना नरसंहारास त्यांनी ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे.

बायडन यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत, चीन आणि रशियात किती लोकांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे, याची कल्पना बायडन यांना नाही. भारत, चीन आणि रशियाने मृतांची खरी संख्या जाहीर केलेली नाही. बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते तर 20 लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असता, असा प्रतिहल्ला ट्रम्प यांनी केला.

बायडन यांनीदेखील ट्रम्प यांच्याकडे कोणतेच नियोजन नसल्याचा आरोप केला. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निधीदेखील नसल्याचे बायडन यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका बायडन यांनी केली.

अमेरिकेत सद्यस्थितीत करोनाबाधित रुग्णांची संख्या ही 74 लाखांपेक्षा पुढे गेली आहे, तर दोन लाखांहून जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आकडेवारीमुळेच अमेरिकेत कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगभरात तीन कोटी 35 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, दोन कोटी 48 लाख नागरिक या आजारावर मात करु शकले आहेत.

तसेच भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आपले कौतुक केले असून अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोना चाचणी झाली आहे. अमेरिकेने भारतापेक्षा चार कोटी 40 लाख अधिक कोरोना चाचणी केली आहे. तसेेच मोदी यांनी मला व्यक्तीश: फोन करून कोरोना चाचणीत चांगले काम केले असल्याचे नेवदामध्ये झालेल्या प्रचारसभेत ट्रम्प यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.