Pimpri : ‘कोरोना’ व्हायरसला घाबरु नका, दक्षता घ्या; उपाययोजनांसाठी महापालिका सज्ज

महापौर उषा ढोरे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – सध्या राज्यात आणि शहरात कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. त्याबाबत पिंपरी महापालिका उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वायसीएम रुग्णालयात आयसोलेशनवार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी काळजी घ्यावी. उपाययोजनासाठी महापालिका सज्ज आहे. शंका असल्यास महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी कोरोना व्हायरसबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. त्यांच्यासोबत आज (शनिवारी) अॅटो क्लस्टर येथे बैठक घेतली. आमदारांनी कोरोना व्हायरसबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पदाधिका-यांनी वायसीएम रुग्णालयातील कोरोना व्हायरस संदर्भात करण्यात आलेल्या आयसोलेशनवार्डची पाहणी केली. यावेळी महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बावळे, डॉ. मारुती गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. निरंजन पाठक उपस्थित होते.

उपाययोजना संदर्भात अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे माहिती देताना म्हणाले, वायसीएम रुग्णालयात कोरोना व्हायरस संदर्भात उपाययोजना म्हणून आयसोलिशन वार्ड तयार करण्यात आला आहे. या मध्ये 8 बेडची व्यवस्था असून 4 महिला आणि 4 पुरुष बेड आहेत. शहरात जनजागृतीसाठी 165 ठिकाणी माहिती फलक, दीड लाख माहिती पत्रकांचे वाटप सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये एन.95 ट्रीप्पल लेयर मास्क मुबलक प्रमाणात आहेत. नागरिकांनी प्राथमिक काळजी म्हणून हस्तांदोलन टाळावे. शिंकतांना किंवा खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा, असे आवाहन डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.