Bhosari News : बालनगरी प्रकल्प रद्द करु नका – विलास लांडे

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात निगडी, संभाजीनगर, संत तुकारामनगर अशा तीन ठिकाणी संगीत कला अकादमी सुरु आहेत. असे असताना आता बालनगरी प्रकल्पाच्या जागी पुन्हा नव्याने  कला अकादमी तयार करण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल करत बालनगरी प्रकल्प रद्द करु नये अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणारा बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर आता गुंडाळण्यात येणार आहे. या प्रकल्पाऐवजी केंद्र सरकारच्या ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी जागा देण्यावर महासभेने शिक्कामोर्तब  केले आहे. त्यामुळे महापालिकेने बालनगरी प्रकल्पावर केलेला 20 कोटी खर्च पाण्यात जाणार आहे.

बालनगरी प्रकल्प रद्द करण्यास माजी आमदार विलास लांडे यांनी विरोध केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे औद्योगिक परिसरामध्ये बालनगरी प्रकल्प उभारावा यासाठी फार प्रयत्न केले. त्या प्रकल्पाची निविदा काढली असून त्यावर आर्थिक खर्चही केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील एक भुषणावह असा हा बालनगरी प्रकल्प तयार होणार होता. परंतु, हा प्रकल्प गुंडाळण्यात आला असून त्या जागेवर आता कला अकादमी उभारण्यात येणार आहे.

शहरात अगोदरच निगडी, संभाजीनगर, संत तुकारामनगर अशा तीन ठिकाणी संगीत कला अकादमी सुरु असताना पुन्हा नव्याने संगीत कला अकादमी तयार करण्याचा घाट का घातला जातो हे कळत नाही. निगडी चौकातील मधुकर पवळे पुतळ्यामागील संगीत अकादमी आहे. ती सद्यस्थितीत चालू आहे किंवा नाही. जर ती चालु असेल तर दुसरी नवीन संगीत कला अकादमी कशासाठी याची माहिती शहरातील नागरिकांना मिळावी. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला, सरकारी, निमसरकारी, उद्योगपती, कामगार, दिन दलितांसाठी एक चांगला व ज्ञानात भर पाडणारा, शहराची बौद्धिक उंची वाढविण्यासाठी हा प्रकल्प झाला पाहिजे असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस होता.

याबाबत विचार करुन महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर भोसरी गवळीमाथा येथील बालनगरी प्रकल्प रद्द करण्यात येवू नये अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.