Indian Railway: आजारी असाल तर प्रवास करू नका, रेल्वेचे नागरिकांना आवाहन

Don't travel if you are sick, appeal to the citizens by indian Railways

एमपीसी न्यूज- रेल्वे विभागाकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेतून अगोदरच आजारपण असलेल्या व्यक्ती देखील प्रवास करत आहेत. रेल्वेने प्रवास करणे अशा व्यक्तींसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यातच विशेष श्रमिक रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या नागरिकांना पूर्वीपासून काही आजार असतील अशा नागरिकांनी विशेष श्रमिक रेल्वेतून प्रवास करू नये, असे आवाहन भारतीय रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी, इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या जात आहेत. मध्यंतरी रेल्वेतून प्रवास करताना काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

विशेष श्रमिक रेल्वेतून रक्तदाब, मधुमेह, हृदय रोग, कर्करोग, प्रतिकारशक्ती कमी असलेले नागरिक तसेच 10 वर्ष वयाच्या कमी आणि 65 वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, “देशातील अनेक नागरिक सध्या प्रवास करू इच्छित आहेत. त्यांना सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वे तत्पर आहे. यासाठी नागरिकांनी रेल्वे विभागाला सहकार्य करावे.

रेल्वे प्रवासाच्या दरम्यान अडचणी आल्यास तात्काळ रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 आणि 138 यावर संपर्क करावा. ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, अशा नागरिकांनी विशेष श्रमिक रेल्वेचा प्रवास टाळावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.