Pune : विजय मिळविण्यासाठी शॉर्टकट नको –  ज्वाला गुट्टा 

बॅडमिंटनेअर संस्थेच्या वतीने आयोजित पुणे डिस्ट्रिक्ट रँकिंग मिनी ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ख्याती कात्रे, विहान कोल्हाडे, सचित त्रिपाठी, धृती जोशी आपापल्या गटांत विजेते

एमपीसी न्यूज – विजय मिळविण्यासाठी कनिष्ठ विभागात वय चोरण्याच्या अनेक घटना आढळून येतात. खेळाडूंनी अशी शॉर्टकट पद्धत न वापरता जिद्दीला मेहनतीची जोड द्याावी म्हणजे निष्कलंक यश मिळविता येते असे जागतिक पदक विजेत्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक ज्वाला गुट्टा यांनी येथे सांगितले.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू धन्या नायर यांच्या पुण्यातील बॅडमिंटनेअर संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे डिस्ट्रिक्ट रँकिंग मिनी ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्वाला यांच्या हस्ते झाला.

या समारंभात दुहेरीतील अव्वल दर्जाच्या खेळाडू ज्वाला यांनी पुढे सांगितले, कनिष्ठ विभागात वयाबाबत पालक व प्रशिक्षकांकडूनच खोटे दाखले देण्याच्या घटना सर्रासपणे आढळून येत आहेत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र त्याचे गंभीर परिणाम खुद्द त्यांच्या व इतरांच्या खेळांडूंचे करिअर होतात याची जाणीव या खेळाडूंना नसते. अशा खेळाडूंचे पालक व प्रशिक्षकांनी अशा घटना टाळल्या पाहिजेत. या ज्येष्ठांनी स्वत:ला आरशात पाहावे व आपण जे कृत्य करीत आहोत ते बरोबर आहे की चूक याची शहानिशा करावी. मुले ही नेहमीच पालकांचे अनुकरण करीत असतात. कालांतराने हीच मुले मोठेपणी अशा प्रकारचे अन्य चुकीचे कृत्य करावयास पुढे मागे पाहणार नाहीत याचे भान पालकांनी ठेवले पाहिजे.

हैदराबाद येथे ज्वाला यांनी नवोदित खेळाडूंच्या विकासाकरिता अकादमी सुरू केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी खेळाचे ऋण फेडण्यासाठी अकादमी सुरू केल्या पाहिजेत. त्याचा फायदा हा खेळ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काही मोजक्याच अकादमी आहेत. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये अकादमी सुरू करण्याची आवश्यकता आहे. क्रीडा क्षेत्र हे काही वेळ घालविण्याचे साधन नाही. क्रीडा क्षेत्रामुळेच जीवनात अडीअडचणींना आत्मविश्वाासाने सामोरे जाण्यासाठी नैतिक बळ मिळते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठीच पडले तर निश्चितपणे आपल्या देशात ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू घडू शकतील. धन्या नायर यांनी येथे अकादमी सुरू करीत अतिशय स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. पालकांनी खेळाडूंच्या प्रशिक्षकांवर विश्वाास ठेवला तर त्याचे करिअर घडण्याचा मार्ग सुकर होतो.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू धन्या नायर यांच्या पुण्यातील बॅडमिंटनेअर संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे डिस्ट्रिक्ट रँकिंग मिनी ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ख्याती कात्रे, विहान कोल्हाडे, सचित त्रिपाठी, धृती जोशी यांनी आपापल्या गटांत विजेतेपद पटकाविले. युतिका चव्हाण व कोणार्क इंचेकर यांनीही अजिंक्यपद मिळविले.

खराडी येथे बॅडमिंटनेअर संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कात्रेने ९ वर्षाखालील गटात रिया देशपांडे हिच्यावर १५-३, १५-३ असा विजय मिळविला. ११ वर्षाखालील गटात तिला अंतिम फेरीत धृती जोशीकडून ११-१५, १०-१५ असा पराभव पत्करावा लागला. मुलांच्या ९ वर्षाखालील गटात कोल्हाडेने अंतिम लढतीत चिन्मय वानखेडे याला १६-१४, १५-३ असे पराभूत केले. ११ वर्षाखालील गटात सचित त्रिपाठीने अजिंक्यपद मिळविताना विराज सराफ याचा १५-११, १५-११ असा पराभव केला.

मुलींच्या १३ वर्षाखालील गटात युतिका चव्हाण विजेती ठरली. तिने अंतिम फेरीत यशस्वी काळे हिला १५-६, १०-१५, १५-८ असे हरविले. मुलांच्या एकेरीत टॉप सीडेड कोणार्क इंचेकरला विजेतेपद मिळाले. त्याने आदर्श राऊत याच्यावर १५-८, १५-७ अशी मात केली. ओजस जोशीने दुहेरीत ईशान लागू याच्या साथीत विजेतेपदाचा मान मिळविला. या जोडीने अंतिम फेरीत आदर्श राऊत व सचित त्रिपाठी यांना १५-१२, १५-१२ असे पराभूत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.