Pune : कर्वे रस्त्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुहेरी उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन 

एमपीसी न्यूज – कर्वे रस्त्यावरील मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. नळस्टॉप चौकात उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाचे  भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल उभारण्याची चर्चा सुरू सुरू होती. मात्र, अखेर मेट्रोचे काम सुरू झाल्याने या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलासाठी येणाऱ्या 60 कोटी रुपये खर्चापैकी महापालिका 35 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. चालू आर्थिक वर्षात त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात 14 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रोचे  पौड रस्ता कर्वे रस्त्यावर काम सुरू आहे. हे काम करतानाच नळस्टॉप येथील वाहतूक समस्या कायमची सोडवण्यासाठी एकाच खांबावर वाहनांसाठी पूल आणि त्यावर मेट्रोची मार्गिका निर्माण करण्याची कल्पना मांडण्यात आली होती. महापालिका आणि महामेट्रोच्या विविध मान्यता प्राप्त झाल्यानंतर अखेर या पुलाचे भूमिपूजन करण्यात आलं.  एकाच खांबाच्या आधाराने वाहतूक आणि मेट्रोसाठी स्वतंत्र पूल बांधण्यात येणार असून, पुण्यातील अशा प्रकारचा हा एकमेव पूल ठरणार आहे. या पुलाच्या खर्चात पालिकेचा वाटा सर्वाधिक असून कोथरूड रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे. असा दावा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.