Pune : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशी ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा डीपीआर तयार – अमोल कोल्हे

एप्रिल महिन्यात निघणार कामाचे टेंडर; चाकण चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज – पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (रा.म. ६०) मोशी (इंद्रायणी नदी) ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार असून एप्रिल महिन्यात या कामाचे टेंडर निघणार असून यामुळे चाकण चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

आज (दि. २ मार्च) संसदभवनात शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या कामासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मोशी ते राजगुरुनगर (रा.म.६०) तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामांची टेंडर प्रक्रिया प्राधान्याने करण्याच्या स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली (राजगुरुनगर) टप्प्यातील सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार असून दोन महिन्यांत भूसंपादन करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि एप्रिल महिन्यात निविदा काढा असे आदेश दिले. यामुळे चाकण चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईन्मेटचा विषय डॉ. कोल्हे यांनी उपस्थित करताच केंद्रीयमंत्री गडकरी यांनी महामेट्रोच्या ब्रजेश दीक्षित यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मेट्रो अलाईन्मेटबाबत सूचना दिल्या.

आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा- चौफुला या रस्त्याचे काम केल्यास मुंबईकडून सोलापूरकडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी उत्तम पर्याय होऊ शकेल, शिवाय अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्याय निर्माण होऊन पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली. त्यावर या रस्त्याचाही सविस्तर प्रकल्प अहवालही (DPR) तयार असून १-२ महिन्यात या रस्त्याची निविदा काढण्यात येईल असे आश्वासन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिले.

सध्या सर्वाधिक ऐरणीवर असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आणून खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने या रस्त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागाराची (consultant) त्वरीत नियुक्ती करण्याची मागणी केली. सध्या असलेल्या रस्त्यावर उड्डाणपूल, मेट्रोसाठी सुविधा आणि भविष्यातील वाहतुकीच्या ताणाचा विचार करण्याची सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी करताच केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ‘ग्रीनफिल्ड हायवे’ची शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. ‘ग्रीनफिल्ड हायवे’ची संकल्पना प्रत्यक्षात आल्यास चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडच्या त्रासातून होईल. परिणामी परदेशी उद्योगांसाठी चांगले वातावरण तयार होईल असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.

आजच्या बैठकीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती मिळणार असून सर्वच प्रकल्प मार्गी लागणार आहेत असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.