Pune : डॉ. अमोल कोल्हे-अच्युत गोडबोले यांना मिळालेला वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार महत्वपूर्ण – शि. द. फडणीस

एमपीसी न्यूज – खासदार डॉ. अमोल कोल्हे (कला) आणि प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले (साहित्य) यांना मिळालेला वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार महत्वपूर्ण असल्याचे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणे आयोजित 19 वे साहित्यिक कलावंत संमेलनात वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले (साहित्य) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (कला) यांच्यातर्फे त्यांचे बंधू सागर कोल्हे यांना शि. द. फडणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रुपये 11 हजार, सन्मानचिन्ह, असे स्व.रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कराचे स्वरुप आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डॉ. अनिल राजपाठक, अनिल डेअड्राय उपस्थित होते.

शि. द. फडणीस म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची उत्कृष्ट भूमिका केली. प्रत्यक्षात त्यांची भूमिका आता वेगळी आहे. ते खासदार आहेत, जनकल्याणसाठी त्यांचे काम आहे. अच्युत गोडबोले यांना जे जे दिसले, ते ते त्यांनी लिहिले. संगणक, आदिवासी, झोपडपट्टीवासीयांचे जीवन सांगितले. अर्थशास्त्र, ज्ञानोटेक्नॉलॉजी, अशा अनेक विषयांवर लिखाण केले, असे विलक्षण व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभल्याची दाद त्यांनी दिली.

अच्युत गोडबोले म्हणाले, मी आतापर्यंत 33 पुस्तके लिहिली असून तज्ज्ञ नव्हे तर आताही विद्यार्थीच आहे. सातत्याने नवीन विषयांचे कुतूहल असते. परीक्षा, मार्कसाठीच पालकांतर्फे सर्व केले जाते. 25 वर्षांनंतर आपल्याला एकही नोबेल नसल्याचे वास्तव त्यांनी मांडले. कुतूहलच आपण मारलेले आहे. विज्ञान, साहित्य, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती बघायला मिळाले. त्यांच्या प्रमाणात आपण काहीच नसल्याचे दिसून आले. सातत्याने पैशाच्या मागे धावणे बरोबर नाही. आपण प्रचंड विषमता, बेकारी आणि प्रदूषण निर्माण केले आहे. ते आटोक्यात येणे अवघड आहे. अंधार, नैराश्य, शेतकरी आत्महत्या खूप आहेत. इंग्रजीत खूप लिटरेचर आहेत. मराठी उत्तम ज्ञान भाषा झाली पाहिजे, असे पुरस्कार मिळाल्याने आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

दिलीप बराटे म्हणाले, साहित्य आणि कलेत उत्तुंग असे काम केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार आम्ही देतोय. हा पुरस्कार यापूर्वी अनेक मान्यवरांना देण्यात आला आहे. संदीप खरे, अशोक नायगावकर, नागराज मंजुळे अशा अनेक नामवंतांना बहाल करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाची सुरुवात छोट्याशा खोलीतून झाली. नवोदित कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हे संमेलन 19 वर्षे झाले सातत्याने भरत आहे. साहित्य – कला हा समाजाचा आरसा आहे. मराठी भाषा जोपासली पाहिजे. मराठी भाषेचे पुढे काय होणार, त्यावर या संमेलनात परिसंवाद झाला. त्यातून अनेकांनी विचार व्यक्त केले. सचिव वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर, संचालक दिवाकर पोफळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.