Pimpri News : बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय झाले? खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले….

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपीलावर आजपासून सुनावणी सुरु झाली. उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढील आठवड्यात इतर राज्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढचा निर्णय दिला जाईल, अशी सकारात्मक गोष्ट आजच्या सुनावणीत दिसून आली. यामुळे नक्कीच पुन्हा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

सुनावणीची माहिती देताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी बैलगाडा मालक, बैलगाडा शौकिन सातत्याने प्रयत्न करत होते. या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती. त्यावरील सुनावणीला आज (सोमवार) सुरुवात झाली.

एप्रिल 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बैलगाडा शर्यतीबाबत एक कायदा केला होता पण, शर्यत विरोधकांनी या कायद्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे मागील चार वर्षापासून ही केस मागील चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. महाराष्ट्र शासनाने बैलगाडी शर्यतीसंदर्भातील प्रलंबित केसवर तत्काळ सुनावणी घ्यावी याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार आज सुनावणीला सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी अत्यंत हिरिरीने जोरदार युक्तीवाद केला. देशातील इतर राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती सुरु असतील. तर, महाराष्ट्रात का नाही? असा युक्तीवाद केला. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरु करण्याची विनंती केली.

उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढील आठवड्यात इतर राज्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढचा निर्णय दिला जाईल. अशी सकारात्मक गोष्ट आजच्या सुनावणीत दिसून आली. यामुळे नक्कीच पुन्हा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

संसदेत बैल या प्राण्याच्या संरक्षित प्राण्याच्या यादीतून वगळावा यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. एका आशावाद पुन्हा एकदा प्रबळ झाला आहे. पुन्हा बैलगाडा शर्यती सुरु होतील. महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला मान देऊन सुनावणी सुरु केली. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मी मनापासून आभार मानतो. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि लवकरात-लवकर याबाबत सकारात्मक निर्णय होऊन महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु होईल अशी आशा बाळगतो, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.