Bhosari : डॉ. भारती गव्हाणे – पाटील ठरल्या मिसेस इंडिया गॅलेक्सी स्पर्धेच्या उपविजेत्या

एमपीसी न्यूज- डॉ. भारती गव्हाणे – पाटील यांनी नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया गॅलेक्सी 2018 या सौंदर्य स्पर्धेत संपूर्ण भारतातून आलेल्या चाळीस स्पर्धकांमध्ये बाजी मारत उपविजेतेपद पटकावले.

मूळच्या भोसरीच्या असलेल्या डॉ. भारती गव्हाणे – पाटील यांना लहानपणापासूनच नृत्य व संगीताची आवड होतीच. त्याचबरोबर त्या अभ्यासात देखील हुषार होत्या. वैद्यकीय शिक्षण घेत असताना देखील त्यांनी आपल्या या आवडी जोपासत कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. आवड जोपासताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होते वा कमी मार्क पडतात या विचाराला त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने खोडून काढले. लग्नानंतरसुद्धा चूल व मूल यापुरते स्वत:चे क्षेत्र सीमित न ठेवता त्यांनी अॅब्सोल्युट स्कीन अँड हेअर क्लीनिक सुरु केले आणि या क्षेत्रात देखील आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवला.

लग्न झाल्यानंतर स्त्रियांच्या आवडींवर मर्यादा पडतात, सौंदर्य टिकवले जात नाही या सर्वसाधारण विधानाला छेद देत डॉ.भारती यांनी मिसेस इंडिया गॅलेक्सी 2018 या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. पुण्यात झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत त्या यशस्वी ठरल्या आणि पुण्यातून निवडलेल्या 100 स्पर्धकांमधून दिल्लीला होणा-या मेगा फायनलसाठी त्यांची निवड झाली.

_MPC_DIR_MPU_II

व्हायब्रंट कन्सेप्ट या गिनी कपूर आणि गगनदीप कपूर यांच्या संस्थेमार्फत स्टॉप व्हायोलन्स अगेन्स्ट वूमन हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु झालेल्या या मिसेस इंडिया गॅलेक्सी 2018 या सौंदर्यस्पर्धेमार्फत घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आत्मविश्वास व बळ देण्यासाठी चळवळ चालवली जाते. महिला सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या कामाच्या माध्यमातून विवाहित स्त्रियांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही सौंदर्यस्पर्धा घेतली जाते. तसेच या सौंदर्यस्पर्धेतून भारतातील सौंदर्य व बुद्धिमत्ता असलेल्या विवाहित स्त्रियांना एक समर्थ व्यासपीठ देखील मिळते. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा सुंदर संगम या स्पर्धेमार्फत घातली जातो. त्यामुळे ही भारतातील एक प्रतिष्ठेची मानली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे.

डॉ. भारती यांची पुण्यातील स्पर्धकांमधून निवड झाल्यानंतर सहा महिने कसून तयारी सुरु होती. वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या या 100 स्पर्धकांना रॅम्प वॉक, ग्रुमींग सोशल अॅक्टिव्हीटी यांचे प्रशिक्षण दिले गेले. त्यातून चाळीस स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. या चाळीस स्पर्थकांची अंतिम फेरी 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान दिल्लीतील पंचतारांकित तिवोली गार्डन येथे झाली. यावेळी चित्रतारका दिव्या मलिक, फॅशन डिझायनर सदन पांडे, सिल्व्ही रॉजर्स, मिसेस युनिव्हर्स अरबएशिया अनुपमा शर्मा, अभिनेता सनी सचदेवा या चित्रपटसृष्टी व फॅशन जगतातील मान्यवरांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच चित्रपटसृष्टी व फॅशन जगतातील शहाना मुकर्जी, राजीव गुप्ता, निशी सिंग, अदिती मुकर्जी, शिवानी शर्मा, जवाहरलाल, रोशनी ठाकूर, दादी चंद्रो तोमर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनेक टॅलेन्ट राऊंडमधून प्रश्नोत्तरांच्या फेरीतून डॉ. भारती यांनी मुद्देसूद व हजरजबाबीपणाने दिलेल्या उत्तरांनी परीक्षकांची मने जिंकली आणि त्या मिसेस इंडिया गॅलेक्सी २०१८ या सौंदर्य स्पर्धेच्या उपविजेत्या ठरल्या.

आपल्या या यशाबद्दल बोलताना डॉ. भारती म्हणाल्या की, इच्छा व मेहनत यांच्या जोरावर कुठलेही काम केले की तुम्हाला यश मिळतेच हेच मी या स्पर्धेत यशस्वी झाल्यावर सिद्ध करुन दाखवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1