Pune News : डॉ. भारती धनंजय पाटील ठरल्या ‘मिसेस युनायटेड नेशन्स 2020’च्या विजेत्या

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुर : 25 देशांतील 79 स्पर्धकांवर यशस्वी मात

एमपीसी न्यूज – सौंदर्य स्पर्धांमध्ये अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी ‘मिसेस युनायटेड नेशन्स’ ही स्पर्धा जिंकण्याचा मान यावर्षी पुण्याला मिळाला आहे. भोसरी (पुणे) येथील स्कीन स्पेशालिस्ट डॉ. भारती धनंजय पाटील यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत 25 देशांतील 79 स्पर्धकांवर मात करून त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे.

युनायटेड नेशन्स (मोनपोर्स) पेजंट्स एलएलसीच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉ. भारती गव्हाणे-पाटील यांनी ‘मिसेस युनायटेड नेशन्स 2020’ होण्याचा मान पटकावला.

 

नवी दिल्ली येथे 5 मे ते 8 मे 2022 दरम्यान या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेर्‍या झाल्या. यावेळी पत्रकार डॉ. संजीव देव मलिक, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरी सदस्य सिद्धेश जाधव, अर्बनिस्टा सीईओ अंडर अँड्रिन डॉ. गरिमा आनंदन, WIGP च्या संस्थापक संचालक व जमैका, घाना आणि नायजेरियाच्या उच्च आयुक्त नीलेश्वरी बसाक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.

जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांची ओळख करून देणे आणि त्याचा प्रसार करणे हे या सौंदर्य स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विजेत्या स्पर्धकांनी आपले कौशल्य, प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर बॅरन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून संबंधित देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तराव सद्भावना व सांस्कृतिक सुसंवाद वाढविणे, जागतिक स्तरावर पर्यटनाची जाहिरात करणे हा देखील या स्पर्धेचा उद्देश आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्र संरक्षण कार्यक्रम व पर्यावरण संवर्धनासंबंधी आखण्यात येणार्‍या धोरणात्मक कार्यक्रमास समर्थन देणे हे देखील एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘मिसेस युनायटेड नेशन्स 20202’ या स्पर्धेचा मुकुट जिंकण्यासाठी एकूण 25 देशांमधून 80 स्पर्धक सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी झाल्यानंतर त्यातून अव्वल पाच फायनलिस्टची निवड करण्यात आली. त्यानंतर निवडलेल्या पाच स्पर्धकांमधून अंतिम विजेत्याची निवड करण्यात आली.

डॉ. भारती पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच विजयी घोडदौड सुरू ठेवली होती. विविध फेर्‍यांमधील सर्व अडथळे आणि प्रतिस्पर्धकांवर यशस्वी मात करत डॉ. भारती पाटील यांनी ‘मिसेस युनायटेड नेशन्स2020’ या सौंदर्य स्पर्धेच्या मुकुटावर आपले नाव कोरले आणि ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली.

या यशानंतर डॉ. भारती पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. डाॅ. पाटील म्हणाल्या, सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ सौंदर्यावर आधारित नसतात, तर इथे बुद्धिमत्तेचाही कस लागतो. आता तर रंग, वय असे निकष खूप बदलले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. सौंदर्य स्पर्धा हे महिलांसाठी स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.