Pune News : बिबवेवाडीतील ‘ईएसआयसी ‘ रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार, डॉ. भूपेंद्र यादव यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – बिबवेवाडीतील ‘राज्य कामगार विमा योजना’ (ईएसआयसी) रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांनी दिले. आमदार माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात यादव यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘राज्य शासनाच्या अखत्यारित ससून सर्वोपचार रुग्णालय हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय शहरात आहे. पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यावर मोठा ताण येतो. नवीन सर्वसाधारण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी मोठी जागा आवश्यक होती. बिबवेवाडीत ‘ईएसआयसी’कडे १६.५ एकर जागा उपलब्ध असल्याने या जागेत पाचशे खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय व्हावे यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.’

मिसाळ पुढे म्हणाल्या ‘या प्रस्तावाला ‘ईएसआयसी’ने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्पात नवीन एकशे वीस खाटांसाठी विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसर्या टप्प्यात आणखी तीनशे ऐशी खाटा वाढविण्यात येणार आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यावरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.