Pimpri News : कोरोनाबाधित पोलीस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा गौरव

0
_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कोरोना संसर्ग झालेल्या पोलिसांना सेवा दिल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा गौरव करण्यात आला. रुग्णालयाच्या वतीने डॉ. यशराज पाटील यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

आजवर केलेल्या कामाबद्दल पोलीस प्रशासनाने कौतुकाची थाप दिल्यामुळे पुढच्या कामाला अधिकच बळ मिळाले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे बुधवारी (दि. 13) हा गौरव सोहळा पार पडला.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, सुरक्षा विभागाचे संचालक बरकत मुजावर आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावात कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची कोरोना तपासणी, कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांवर आंतररुग्ण विभाग उपचार आदींची दखल घेऊन आयुक्तालयाने रुग्णालयाचा गौरव केला.

आज बुधवारी ( दि. १३) रुग्णालयातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शेवटचा पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाला. अशाप्रकारे एकूण 400 हून अधिक कोरोना तपासण्या व 200 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.