Dr. Govind Swarup Passed Away: भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज – भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अल्पशा आजाराने आज रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.

त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा औंध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. गोविंद स्वरूप हे नॅशनल सेंटर फॉर रेडिओचे संस्थापक संचालक होते. डॉ. गोविंद स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आणि उटी येथे रेडिओ दुर्वीण उभारण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण म्हणजेच जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या उभारणीत डॉ. गोविंद स्वरूप यांचा सिंहाचा वाटा होता.

डॉ. गोविंद स्वरूप यांचा जन्म ठाकूरवाड्यात 1929 साली झाला. त्यांनी 1950 मध्ये अलाहाबाद येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी 1952 मघ्ये ऑस्ट्रेलियातील CSIRO येथे खगोलशास्त्रात काम सुरू केले. सिडनीजवळ पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या 32 अन्वस्त (पॅराबोलिक) अ‍ॅन्टेना उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून 1961 साली पी.एचडी पूर्ण केली. त्यानंतर ते टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्चचे अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये रुजू झाले.

पद्मश्री, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, एच. के. फिरोदिया पुरस्कार, ग्रोटे रेबर पदक अशा अनेक प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी डॉ. गोविंद स्वरूप यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप देखील मिळाली होती.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अरविंद नातू आदी मान्यवरांनी डॉ. गोविंद स्वरूप यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला असून त्यांना आदरांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.