Pune : 25 वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पुण्याचे कौस्तुभ राडकर पहिले भारतीय

एमपीसी न्यूज – धावणे, पोहोणे आणि सायकल चालविणे यांचा कस लावणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा पुण्यातील जलतरणपटू असलेल्या डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 25 वेळा ही पूर्ण करून इतिहास रचला आहे. डॉ. कौस्तुभ 25 वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय पुरुष ठरले आहेत. वर्ल्ड ट्राएथ्लॉन कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली आर्यनमॅन ही स्पर्धा न्यूझीलंड येथील टॉपो लेक या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये डॉ. कौस्तुभ यांनी 25 आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम पूर्ण केला.

डॉ. कौस्तुभ राडकर हे मूळचे पुण्याचे असून अमेरिकेमधून त्यांनी शल्य तंत्रामधून पदव्युत्तर पदवी (एम. एस) आणि विद्यावाचस्पती (पीएचडी) या पदव्या मिळविल्या आहेत. आपल्या महाविद्यालयीन काळात फ्री स्टाईल या पोहोण्याच्या प्रकारात डॉ. कौस्तुभ यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम नोंदविले आहेत. त्यानंतर त्यांच्यात धावण्याची आवड निर्माण झाली व त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवीत आपला वेगळा ठसा उमटविला.

याविषयी सांगताना डॉ. कौस्तुभ राडकर म्हणाले, “आयर्नमॅन ही स्पर्धा शारिरीक श्रमाबरोबरच मानसिक श्रमाची क्षमता पाहणारी स्पर्धा आहे. 25 वेळा आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय पुरुष असल्याचा मला अभिमान आहे. याबरोबरच या वर्षी 100 आयर्नमॅन प्रशिक्षित करण्याचा विक्रम देखील मी करीत आहे.

डॉ. राडकर हे 2017 साली कोना (हवाई) येथे झालेल्या जागतिक आर्यनमॅन स्पर्धेत भारताचे प्रतिधित्व करणारे आणि ती पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय होते. याशिवाय 2017 साली अल्ट्रामॅन स्पर्धा (10 किमी पोहणे, 421 किमी सायकलिंग व 84.3 किमी धावणे) पूर्ण करणारे जलद भारतीय म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. याशिवाय ते एकमेव आशियाई व्यक्ती आहेत ज्यांनी जगातील 6 खंडांमध्ये (आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व उत्तर अमेरिका इ.) झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. जगभरात अशा केवळ 3 व्यक्ती असून डॉ. राडकर हे जगातील 4 थे तर आशियातील पहिलेच धावपटू आहे. 2016 साली झालेल्या कोमराड्स अल्ट्रामॅरेथॉन मध्येही ते सर्वात जलद भारतीय ठरले होते.

कौस्तुभ यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर अमरिकेतील इंडियाना विद्यापीठात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची पदवी घेतली. नंतर व्हिसकॉन्सिन विद्यापीठातून याच क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. क्रीडावैद्यक शास्त्रातील एमबीए केले. शैक्षणिक पार्श्वभूमी याच क्षेत्राशी निगडित असल्याने त्यांनी ‘ट्रायथलॉन’साठी आवश्यक प्रशिक्षण देणे देखील सुरू केले. भारतीय पहिले सर्टिफाईड आयर्नमॅन प्रशिक्षक म्हणूनही डॉ. कौस्तुभ ओळखले जातात, संपूर्ण आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केलेल्या तब्बल 50 पेक्षा जास्त जणांना कौस्तुभ यांनी प्रशिक्षण दिले आहे. यावर्षी हा आकडा 100 वर जाणार असून हाही डॉ. कौस्तुभ यांच्या नावे असलेला विक्रमच आहे.

सध्या कौस्तुभ हे अनेक भारतीय व परदेशी टेनिसपटू, क्रिकेटपटू, आयसीसीचे अंपायर व इतर खेळातील खेळाडूंना प्रशिक्षित करीत आहेत. मेंटर, प्रशिक्षकाबरोबरच फिटनेस कन्स्लटंट म्हणूनही ते अनेक टेनिस व फूटबॉल लीगच्या संघांना प्रशिक्षण देत असतात. डॉ. कौस्तुभ हे रेडस्ट्राँग या संस्थेचे संस्थापक व संचालक असून याद्वारे ट्रायथॉन, धावणे याचे प्रशिक्षण ते देत असतात. याबरोबरच हदय रोग झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याच्या कामासाठी देखील त्यांची संस्था काम करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.