Pune : डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे, महाराष्ट्र मागे जात असल्याचे त्यांचे वक्तव्य दुर्दैवी – पियुष गोयल यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झालेत. ते स्वतः क्लिन असले तरी, त्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. टेलिकॉम, कोळसा घोटाळा, महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सिंचन घोटाळा झाला. त्यांच्या सारख्या अर्थतज्ज्ञ व्यक्तीने महाराष्ट्र मागे जात असल्याचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.

पीयूष गोयल म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात महागाई 12 ते 13 टक्के होती. 5 ते 6 वर्षे त्याचे परिणाम भोगावे लागले. आम्ही 5 वर्षांत महागाई घटविली. व्याज दर घटवले. 2014 मध्ये चांगले काम केल्याने जनतेने 2019 मध्ये प्रचंड जनादेश दिला. रिझर्व्ह बँकेकडे पडून असलेला पैसा आम्ही जनतेच्या विकासासाठी वापरत आहे.

आम्ही पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्टाचा वाटा एक ट्रीलियन डॉलर आहे. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. सर्वच घटक सुखी असल्याचे वातावरण आहे. ही निवडणूक एकतर्फी वाटत आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये, असे आवाहनही गोयल यांनी केले. पुण्यात काल झालेल्या मोदी यांच्या सभेमुळे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर, रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही. पण, सुधारणा होणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.