Dr. Ramachandra Dekhane : लोकसंस्कृतीचे ‘देखणे’ विद्यापीठ

एमपीसी न्यूज – संत साहित्याचे, लोकवाङ्मयाचे  अभ्यासक, ललित लेखक, वक्ते ,भारुडसादरकर्ते , प्रवचनकार अशा विविधअंगांने डॉ. रामचंद्र देखणे (Dr. Ramachandra Dekhane) उभ्या महाराष्ट्राला सर्वपरिचित होते. त्यांना श्रीकांत चौगुले यांनी वाहिलेली शब्दसुमनांजली.

उपजे ते नाशे ।
नाशे ते पुनरुपी दिसे ।
असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. तो सृष्टीचा नियम आहे. तो आपल्याला पटतोय, पण व्यवहारात तशी वेळ येते तेव्हा मन मानत नाही. डॉ. रामचंद्र देखणे गेल्याची वार्ता पहिल्यांदा साहित्यवर्तुळात पसरली, पण ती बातमी माध्यमात दिसत नव्हती. तेव्हा खात्री करण्यासाठी अनेकांच्या चौकशी सुरू होत्या, कारण ही बातमी धक्कादायक होती.
डॉ. देखणे हे संत साहित्याचे, लोकवाङ्मयाचे अभ्यासक, ललित लेखक, वक्ते, भारुडसादरकर्ते, प्रवचनकार. अशा विविधअंगांने सर्वपरिचित होते. गेल्या पंचवीस वर्षापासूनचा त्यांचा परिचय होता. अनेक कार्यक्रमांत भेट व्हायची, अनेक वेळा त्यांच्या घरी किंवा प्राधिकरणातल्या ऑफिसमध्ये मुद्दाम भेट घेतली आहे. अनेकदा गप्पा चर्चा होत. अत्यंत दिलखुलास आणि कुणाबद्दलही, कसलाही पूर्वग्रह नसलेला, नितळ मनाचा निर्मळ माणूस. असेच त्यांच्याबद्दल म्हणता येईल. कुणाबद्दलही कसलीही मनात अढी नाही, त्यामुळे कोणत्याही विचारांचे, जाती-पंथांचे, कोणत्याही पक्षाचे, अशा सर्वांशी त्यांची जवळीक होती. ते अजातशत्रू होते. नावाप्रमाणे देखणे रूप आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. कसलीही आग्रही भूमिका नाही. तशी मांडणी नाही. नेहमी समन्वयवादी भूमिका असायची.

शिरूर तालुक्यातील रांजणगावच्या अलीकडे (Dr. Ramachandra Dekhane) असलेलं कारेगाव, हे त्यांचे मूळगाव. घराण्यात वारकरी परंपरा. वडील अनंत देखणे कीर्तनकार. बाल वयात वडिलांच्या भजन कीर्तनात सहभागी होता होता, संप्रदायाची गोडी लागली. पुढे संत साहित्याचा जाणीवपूर्वक अभ्यास घडला. ‘भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ या विषयावर पीएचडी मिळाली. अभ्यासलेला विषय लोकांपुढे मांडावा म्हणून भारुडावर व्याख्याने सुरू झाली.व्याख्यानांना सादरीकरणाची जोड मिळाली. प्रतिसादामुळे सहकारी कलाकारांची भर पडत गेली. मग बहुरूपी भारुड हा चाळीस-पन्नास कलाकारांच्या संचातील मोठा कार्यक्रम उभा राहिला. तो लोकांना आवडला. त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग झाले. 2100 प्रयोगांचा टप्पा गाठल्यावर, त्याचा विशेष कार्यक्रम बालगंधर्वमध्ये आयोजित केला होता.डॉ. देखणे उच्चशिक्षित, प्राधिकरणातील अधिकारी, पण नाथांची भारुडं सादर करताना, त्यांना कशाची लाज-चिंता वाटत नसे. ते कडकलक्ष्मीच्या वेशात, उघड्या अंगाने स्टेजवर वावरत. भारुड सादर करत. अंगावर कोरडे मारून घेत. त्यांचा जोश आणि संत साहित्यावर असलेलं प्रेम त्यांच्या सादरीकरणातून क्षणोक्षणी जाणवत असे. कार्यक्रम कोणताही असो, त्यांचे भाषण रंगले नाही असा एकही प्रसंग माझ्या पाहण्यात नाही. त्यांच्या भाषणाला हमखास दाद मिळत असे. त्यांच्या भाषणात संत साहित्याचे दाखले, दृष्टांतवजा किस्से आणि शब्दांची चमत्कृती पाहायला मिळत असे.अनेकदा ते सहजपणे व्याख्या करून जात. नावा गावाशी, स्थळाशी सहजपणे समन्वय जोडत. त्यांच्या व्याख्यानाची, भाषणाची प्रवचनाची सुरुवातच विलक्षण असे,

भरड्यांना.. गोंधळ्यांना..दांगटांना..पिंगळ्यांना, शाहिरांना…(Dr. Ramachandra Dekhane)

लोकसंस्कृतीच्या सर्व उपासकांना…. असे ज्या गतीने आणि ज्या श्रद्धेने ते म्हणत, त्यालाच टाळ्यांची पहिली दाद मिळे मग पुढचे भाषण तर मेजवानीच ठरत असे.गोंधळ, भारुड, लोककला, वारी, दिंडी हे त्यांच्या आवडीचे विषय. या विषयावर त्यांनी सदर लेखन केले. त्याची पुस्तके झाली. वारी आणि त्यांचे नाते अतूट होते. ते आषाढी वारीला नेमाने जात. त्यांची एक वेगळी दिंडी होती. त्यात अनेक साहित्यिक, लोककलावंत सहभागी होत. अप्पा बळवंत चौकात डीएसके चिंतामणीमध्ये त्यांचा तळमजल्यावर फ्लॅट आहे. बाजूला मोकळी जागा आहे. तिथे अनेकवेळा, अनेकांची कीर्तने, प्रवचने होत. वारीच्या काळात वारकऱ्यांना तिथे भोजन असे. त्यांचे घर वारकऱ्यांसाठी सदैव स्वागतशील असते.

 

दरवर्षी वारीच्या काळात कोणत्या ना कोणत्या दैनिकात त्यांचे सदरलेखन  ठरलेले. अशा प्रासंगिक लेखनातून आणि ठरवून केलेल्या लेखनातून त्यांची 49 पुस्तके झाली. त्यानंतर त्यांचे गौळण वाङ्मय आणि स्वरूप. हे पन्नासावे पुस्तक 8 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित झाले. पुस्तक पन्नाशी  हा देखणा सोहळा बालगंधर्वमध्ये झाला. यावेळी छोट्या नातवाने भजन सादर केले होते, याचा त्यांना विशेष आनंद वाटला होता. घराण्यात तशी परंपरा पुढे चालू आहे. मुलगा भावार्थ हा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कीर्तन करत असतो.

Dr. Ramachandra Dekhane

वाघ्या-मुरळी, भराडी, गोंधळी, पिंगळा, पांगुळ अशा ज्यांनी ज्यांनी लोकसंस्कृती घडविली, अशा लोकसंस्कृतीच्या उपासकांबद्दल, लोककलावंतांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आदर होता. अशा स्थानिक कलावंतांना ते आपल्या कार्यक्रमात संधी देत. अशापैकीच पिंपरी चिंचवडमधील चौघडा सम्राट दत्तोबा पाचंगे हे एक प्रारंभीच्या काळात डॉ. देखणे यांनीच त्यांना संधी दिली. पुढे त्यांचे नाव झाले.पिंपरी चिंचवड शहराशी, इथल्या माणसांशी त्यांची विशेष जवळीक होती. ते राहायला पुण्यात, नोकरीला पिंपरी चिंचवडला होते. कधी कधी ते गमतीने म्हणत. ‘माय मरो आणि मावशी उरो’ असे मावशीचं नातं माझं या शहराशी आहे.

Dr. Ramchandra Dekhane : संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

89 वे साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडला झाले. सुरुवातीला त्यांचे नाव आघाडीवर होते. शहरातील अनेकांनी त्यासाठी आग्रह धरला होता. आमचेही बोलणे झाले होते, पण त्यांनी तेव्हा माघार घेतली. येत्या काही वर्षात नक्की त्यांना संधी मिळाली असती. मी त्यांना म्हणायचो, ”तुम्हाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पाहायचे आहे.” पण ते नियतीच्या मनात नसावं. ते त्यांच्या आणि आपल्याही नशिबात नसावं, म्हणूनच हे अघटीत घडलं.
एका कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्यांच्या आडनावावरून विचारलं असता, त्यांनी खुलासा केला होता. ‘गागाभट्टांचा आमचा वंश. आमचे पूर्वज काशीला होते. त्यापैकी काही पुन्हा महाराष्ट्रात आले. म्हणजेच दक्षिणेला आले, म्हणून आम्हाला दख्खने म्हणत. त्यावरून पुढे देखणे झाले. त्यांचा स्वभाव, वागणं बोलणं आणि कार्यकर्तृत्व यामुळे अशक्य वाटाव्या अशा अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्यांचे शिक्षण मूळातले विज्ञान शाखेचे. ते बीएससी होते. तरीसुद्धा त्यांना एमएसाठी विशेष मान्यता मिळाली, म्हणूनच ते पुढे पीएचडी करू शकले. ते प्राधिकरणात जनसंपर्क अधिकारी होते. ते वर्ग दोनचे पद होते, त्याच पदाला अन्य काही जबाबदारी देऊन, शासनाने वर्ग एकची विशेष मंजुरी दिली होती.

देखणे सरांना अनेक पुरस्कार मिळाले. विभागीय संमेलनापासून अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. पण कर्नाटक राज्यातील सीमा भागातील, मराठी माणसांनी आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे. ते महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचे सदस्य होते. अनेक संस्थांचे, व्यक्तींचे मार्गदर्शक होते. त्यांच्या अकाली जाण्याने, साहित्य संस्कृती आणि संप्रदाय या सर्वच बाबतीत त्यांची उणीव जाणवेल. ती पोकळी भरून काढणे अवघड आहे. शेवटी संत वचनाद्वारेच त्यांना ही भावांजली…
 जैसे जी जीर्ण वस्त्र सांडिजे। मग नूतन वेडीजे । तैसे देहांतराते स्वीकारीजे । चैतन्यनाथे ।….
– श्रीकांत चौगुले
श्रीकृपा, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, पुणे 61
मो नं 7507779393.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.