‘हॅम्लेट’ अफाट सूडनाट्याचा दुर्देवी अंत अन तरीही नेत्रदीपक

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- खरतर पाश्चात्य कलाकृती बघताना आपण तिच्याशी नातं सांगु शकतो का ? हा गहन प्रश्न असतो …त्यातुन शेक्सपियर नामक जगविख्यात लेखकाच्या समृध्द लेखणीतुन सज्ज झालेलं नाटक… म्हणजे कदाचित न समजणारं असं काही तरी असु शकतं, असा एक आपला समज ! दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्या विचारी आणि समृध्द टीमनं ‘हॅम्लेट’ हे नाटक मराठीत करण्याचं शिवधनुष्य लीलया पेललयं.

मेलोड्रामाचा बाज असुनही कुठेही मेलोमेलो ड्रामा अजिबात झालेला नाहीये, अत्यंत संयत मांडणी आणि सर्वकालीन रचना यांचा सुंदर मिलापच यात झालेला आहे. सुमित राघवनने साकारलेला हॅम्लेट तर विलक्षण आहे. कुठेही मोठ्या नटाचा ढोंगी अभिनिवेश नाही की, काही नाही फक्त शंभर नंबरी सोन्यासारखं अस्सल वावरणं, अत्यंत नैसर्गिक आणि शिस्तबध्द अभिनय यामुळे शेवटी पडदा पडताना रसिक हॅम्लेट मध्येच गुंतलेले !

बरं बाकीच्यांचा अभिनयही अगदी सुसंगत. विशेष उल्लेख तुषार दळवी आणि मुग्धा गोडबोले यांचा. कुठेही कृत्रिमपणा नाहीच. खलपात्र वाट्याला आलेलं असतानाही तुषार दळवींनी कुठेही तो अतिरंजीत होऊ दिला नाही आणि त्यांच ते पात्र कुठल्याही काळात हे असच वागलं असतं हे मनोमन पटतं. मुग्धा गोडबोलेंनी साकारलेली आई आणि आपल्या पतीच्याच भावाबरोबर केलेलं लग्न आणि त्यात परिस्थितीने ओढवलेला खलनायिकेचा डाग असुन सुध्दा तिची ती हतबलता अंगावर येते.

मनवा नाईकने साकारलेली हँम्लेटच्या आकंठ प्रेमात बुडायला जाणारी व्यक्तीरेखा अजुन निराळी आणि हवीहवीशी होऊ शकली असती, असं वाटतं. पण ते गाण्याप्रमाणे कधी सुर गवसतात अन कधी फक्त तो भूमिकेभोवतीचा फेरफटकाच ठरतो तसं झालं आहे. पण तरीही ती त्या नाटकाच्या बाहेरची वाटत नाही. नातं तर आपण त्या व्यक्तीरेखेशी जुळवत असतो. सुनिल तावडे यांनी ही विनोदी आणि गंभीर भूमिकेचा समतोल फार छान साधला आहे. भूषण प्रधान आणि सुमीत राघवन यांच्यात झालेली तलवारबाजी नेत्रदीपक झाली आहे.

मुळात हे चारशे वर्षापुर्वीचं नाटक आहे. त्यामुळे ते निभावणं निश्चितच आव्हानात्मक आहे. जुनं नाटक काळसुसंगत निभावणं हेच यश पाहाणार्‍यांना भावतं. आणि भव्यतेमुळे आपण काहीतरी अचाट पाहातोय अशी जाणीव प्रत्येक प्रवेशात आपल्याला होत असते. अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे फास्टफुडच्या या जमान्यात हे ३ अंकी नाटक आपल्या पुढे सादर होतं आणि तरीही नवी पिढी सुध्दा नाटक पाहाताना मोबाईल पाहात नाही अन कंटाळत ही नाही हे विशेष

मुळात ही एक शोकांतिका आहे, तिचं क्लासिकपण अगदी उत्तम जपलं गेलय…नवीन पिढीपर्यंत एक क्लासिक नाटक उत्तमरित्या पोहोचवलंय पुढे ही पोहोचवतील ही आशा. विल्यम शेक्सपियर यांनाही हा मराठीतला “आमचा ” हॅम्लेट नक्कीच आवडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.