BNR-HDR-TOP-Mobile

Pune : नव्या पिढीच्या नात्यांवर भाष्य करणारे नाटक – ‘नातंlogy’

एमपीसी न्यूज – आजकाल नाती किती इंटरेस्टिंग झाली आहेत ना! ही नाती टिकली तर नवल वाटत आपल्याला. पण पूर्वी असं होतं का? मग पूर्वीची नाती का टिकायची? कारण इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा नात्याला महत्त्व दिलं जायचं. आता नात्याला महत्त्व द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं ? नाती बांधून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? हे सगळं सांगणारं ‘नातंlogy’ (नातंलॉजी) हे  नवं कोरं मराठी नाटक  प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या नाटकाचा पहिला प्रयोग १५ नोव्हेंबर रोजी पार पडला. पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघून पुढचे प्रयोग लगेच लावण्यात आले आहेत. येत्या २१ डिसेंबरला बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटकाचे लेखन मृणाल माने हिने केले असून दिग्दर्शन सागर पवार यांनी केले आहे. तर आरजे केदार जोशी आणि मृणाल माने यांची मुख्य भूमिका आहे. ‘नातंlogy’ हे नाटक म्हणजे ‘स्पंदन नाट्यकला अकादमी’चा नवा उपक्रम आहे. यात तरुणांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच प्रायोगिक नाटक सादर करायचे ठरवले आहे. याआधी स्पंदन कला अकादमीतर्फे मामला चोरीचा, ग्रँड फादर, जमलं बुवा एकदाच, शांतेच कार्ट या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सादर केले गेले आहेत.

नाटकाची सुरुवात होते ती नायक आणि नायिकेच्या ओळखीतून आणि मग आपल्यासमोर अनेक उदाहरणे घडत जातात. ही उदाहरणे जितकी खरी तितकीच मनोरंजकही आहेत. नाटक जसजसे पुढे जात राहते तसतसे नात्यांचे अनेक पैलू उलगडत जातात. या नाटकातले अनेक प्रसंग आपल्याही आयुष्यात घडले आहेत असेच आपल्याला वाटते. सुरूवातीला हलक्या फुलक्या प्रसंगांनी रंगलेले नाटक मध्यांतराआधी आपल्याला धक्का देऊन जाते. नवीन पिढीचे वर्च्युअल जगाशी असलेले नाते, त्यातून हरवत चाललेली खऱ्या जगातली नाती, ब्रेकअप्स, पॅच-अप्स अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारे हे नाटक आहे. नाटकाचा विषय, त्यातील पात्रे, पात्रांचा अभिनय आणि घडणारे प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतात.

आजची Special नातंlogy रेसिपी…

साहित्य :

एक चमचा भरून ओळख, आयुष्यभर पुरेल एवढं निखळ नातं, तेवढाच विश्वास, हृदय भरून प्रेम, चवीपुरती भावना, चिमूटभर रुसवा-फुगवा, नातं घट्ट होण्यासाठी आदर किंवा सन्मान, नातं सजवण्यासाठी गोड हसू.

कृती :

मनामध्ये थोडीशी ओळख घालून ती नीट समजावून घ्या.

त्यात निखळ नातं घालून ते नीट एकत्र करा.

अर्थात ओळख असल्याशिवाय नात्याला स्वाद येणारच नाही.

ओळख व नातं छान एकत्र झालं की त्यात चवीपुरती भावना, प्रेम व विश्वास घालून पुन्हा एकत्र करा.

या मिश्रणाला प्रेमाचा एक वेगळाच रंग येईल आणि विश्वासाने नातं अधिकच चवदार होईल.

या मिश्रणात चिमूटभर रुसवा-फुगवा घालून पुन्हा एकदा एकजीव करा.

नातं अधिक रुचकर होण्यासाठी त्यात चिमुटभर का होईना पण रुसवा-फुगवा हवाच, त्याशिवाय मजा येत नाही. हा रुसवा-फुगवा नात्यात विरघळून जाईल तेंव्हाच नात्याला खरी चव येईल.

आता ही नाती अधिक घट्ट व्हावी असे वाटत असेल तर त्यात आदर-सन्मान मिसळा व एकजीव करा.

आता ही नात्यांची डिश सजवण्यासाठी त्यावर गोड गोड हसू पसरा आणि प्रत्येकाला या घट्ट नात्यांची चव चाखायला द्या. ही घट्ट नाती आयुष्यभर छान टिकतात. प्रत्येकाने या घट्ट नात्यांची मेजवानी केलीच पाहिजे!

अशीच मेजवानी आम्ही घेऊन येतोय #नातंlogy

प्रस्तुतकर्ते:  स्पंदन नाट्य कला अकादमी

निर्माता: कृष्णा धानपुणे, रामदास खोपडे

लेखिका- मृणाल माने

दिग्दर्शक –  सागर पवार

कलाकार- मृणाल माने, ऋतुजा भट, अश्विनी देवरे, किरण काटकर, जय देशपांडे, RJ केदार   जोशी, जयेश देशमुख, मयूर मोरे, सिद्धेश घोलप

HB_POST_END_FTR-A2

Advertisement