Pune : घरातील पैशाबरोबर मुलाला इंजिनिअर बनवायचं स्वप्न सुद्धा गेलं वाहून ! 

एमपीसी न्यूज – “मी घरकाम करते , माझे पती हमाली करतात. आम्हाला 4 मुलं आहेत. त्यातील 2 अपंग, अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेलं. तरी मुलाला इंजिनिअर करायचंच ठरवलं होतं. मुलाच्या जेईईच्या क्लासला भरण्यासाठी माझ्या पतीने मित्राकडून दीड लाख रुपये आणले होते. पण सकाळी पाणी आलं अन घर, पैशासाहित आमचे स्वप्न सुद्धा वाहून गेले. हे सांगताना शेवंता बोडेकर यांनी इतक्यावेळ दाबून धरलेला हुंदका सोडला अन एकच टाहो फोडत प्रशासनाला जाब विचारला सांगा आता आम्ही काय करायचं ? 

पुण्याच्या दांडेकर पूल येथील मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे शहराला पुराचे स्वरुप आले होते. कालव्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील २०० हून अधिक कुटुंबाचे संसार या पाण्यात वाहून गेल्याने येथील नागरिक बेघर झाले आहेत.

अचानक आलेल्या पाण्यात सुरेश बोडेकर यांच्या घरातील अनेक गोष्टी वाहून गेल्या आहेत. त्यातच त्यांनी साठवलेले पैसेही वाहून गेले. मुलाच्या जेईईच्या क्लाससाठी बोडेकर यांनी ही रक्कम ठेवली होती.

मार्केटयार्ड येथे हमाली करणारे सुरेश बोडेकर यांनी मित्राकडून आणलेली दीड लाख रुपयांची रक्कम वाहून गेलीे. क्लासच्या फीचे सगळे पैसे वाहून गेल्याने आता क्लासला प्रवेश कसा घेणार असा यक्षप्रश्न बोडेकर कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.