Dreamgirl Hema supports Jaya : ड्रीमगर्ल हेमा यांचा जया बच्चन यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात आपल्या उथळ बोलण्याने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावत यशस्वी झाली होती. पण त्यानंतरही तिची वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधाने ट्वीटरच्या माध्यमातून सुरुच आहेत. आता तर तिने प्रक्षोभक विधाने करताना लहान – मोठे, प्रस्थापित अशी देखील तमा बाळगली नाही. एकीकडे महाराष्ट्र सरकारवर टीका करताना तिचे भान काही वेळा सुटलेच होते. पण आता ज्या बॉलिवूडने तिला ओळख दिली त्याबद्दलही ती अनेक वादग्रस्त विधाने करत आहे.

कंगनाने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांमुळे संतापलेल्या अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले. कंगनापाठोपाठ भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपाचा खासदार असलेल्या अभिनेता रविकिशन यांनी देखील संसदेत ड्रगमाफियांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर त्यांना खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जया यांच्या या भूमिकेला अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पाठिंबा दिला आहे. खोटे आरोप करुन या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका त्यांनी कंगनावर केली.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी कंगना वादावर प्रतिक्रिया दिली. ‘नाव, सन्मान, प्रसिद्धी, पैसा सर्वकाही मला याच इंडस्ट्रीने दिलं आहे. बॉलिवूड हे एक सुंदर क्षेत्र आहे. कला आणि संस्कृतीचं योग्य मिलन या उद्योगात होतं. या इंडस्ट्रीने वेळोवेळी समाजाची मदत केली आहे. नेहमीच जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. बॉलिवूड ही भारतातील एक महत्त्वाची इंडस्ट्री आहे. लाखो लोकांचा रोजगार या इंडस्ट्रीवर आधारित आहे. त्यामुळे बॉलिवूडबाबत असे आरोप आम्ही सहन करु शकत नाही’, अशी प्रतिक्रिया देत हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांना पाठिंबा दिला.

खरंतर हेमामालिनी या भाजपच्या खासदार आहेत. तर जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत. पण बॉलिवूडचा मुद्दा समोर आल्यावर हेमा या जया बच्चन यांच्यासमवेत खड्या ठाकल्या आहेत.

याआधी राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या होत्या की, मनोरंजन विश्वातील लोकांबद्दल सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरु नये असं सरकारकडून सांगण्यात यावं, अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.