Pune : घरफोडी करणाऱ्या चोरट्यालाअटक; 30 तोळ्यांचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज – कोंढवा परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी गुलबर्गा ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय 28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रवीण चंद्रकांत गायकवाड (सध्या रा. किरकिटवाडी,  पुणे  मूळ रा. बलुर्गी, ता. अफजलपुर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2019 रोजी संदीप बधे (रा.खडीमशीन चौक,कोंढवा पुणे) हे त्यांचे घर बंद करून कुटुंबासह बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा दरवाजा उचकटून घरामध्ये प्रवेश करून 32 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 48 हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे 09 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत संदीप यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही चोरी संदीप यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या प्रवीण याने त्याच्या एका साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या पत्त्यावर पोलिसांनी सुरुवातीला चौकशी केली. मात्र तो मिळून न आल्याने कोंढवा पोलिसांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

6 एप्रिल 2020 रोजी आरोपी काशिनाथ चंद्रकांत गायकवाड यास गुलबर्गा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतले. याबाबत त्यांनी कोंढवा पोलिसांना माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी गुलबर्गा ग्रामीण पोलिसांकडून काशीनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरी केलेले तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथून काढून दिले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार इक्बाल शेख, पोलीस हवालदार योगेश कुंभार ,पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे ,पोलीस नाईक कौस्तुभ जाधव ,पोलीस शिपाई अजीम शेख, पोलीस शिपाई मोहन मिसाळ ,पोलीस शिपाई उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.