Chinchwad News : चालकांचा हलगर्जीपणा देतोय प्राणांतिक अपघातांना आमंत्रण; वर्षभरात 318 प्राणांतिक अपघात

एमपीसी न्यूज – खराब रस्ते, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. यात चालकांचा हलगर्जीपणा हे महत्वाचे कारण अपघातांना निमंत्रण देत आहे. पेट्रोल, डीझेलचे काही युनिट वाचविण्याच्या नादात वाहन न्युट्रल, बंद करून चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात 318 प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात 325 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर किरकोळ अपघातांचा आकडा कित्येक पटींनी मोठा आहे.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. कारखान्यांमध्ये येणा-या वाहनांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणत आहे. त्याचबरोबर खाजगी आणि सार्वजनिक सेवेतील वाहने देखील मोठ्या प्रमाणत आहेत. नियोजितपणे वसलेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. शहरातले रस्ते, उड्डाणपूल प्रशस्त आहेत. मात्र, वाहतुकीला शिस्त नसल्याने अपघात होत आहेत. या अपघातांचे खापर केवळ बेशिस्त वाहन चालकांच्या माथी फोडून चालणार नाही. खड्डेमय रस्ते सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत.

जरासा उतार दिसला तरी वाहन चालक पेट्रोल, डीझेल वाचविण्यासाठी वाहन न्युट्रल करतात अथवा बंद करतात. न्युट्रल अथवा बंद केलेल्या वाहनाचे ब्रेक तातडीने लागत नाहीत. त्यामुळे समोरच्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. अवजड वाहनाने मागून धडक देऊन झालेल्या अपघातांचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. अनेक दुचाकीस्वारांना चेंगरून ही वाहने बेदरकारपणे पुढे गेलेली आहेत.

मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात 318 प्राणांतिक अपघात झाले. यात सव्वातीनशे पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. हात, पाय, बरगड्या मोडणे, फ्राक्चर होणे, खरचटणे अशा अपघातांची संख्या तर कित्येक पटींनी अधिक आहे. यातील 232 अपघातांच्या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले. मात्र 86 प्रकरणांमध्ये आरोपीच निष्पन्न झालेले नाहीत.

अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता, जखमींना हॉस्पिटलमध्ये न नेता पळून जातात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांनी प्राण सोडले आहेत. ज्याच्या चुकीमुळे अपघात झाला आहे, त्यांनी जर जखमींना रुग्णालयात नेले; अथवा बघ्यांनी केवळ मोबाईल फोनमध्ये अपघात कैद न करता जखमींना उपचार मिळवून दिले तर प्राणांतिक अपघातांची संख्या कमी होईल.

अवजड वाहनाच्या धडकेत जास्त मृत्यू होत आहेत. अपवादात्मक घटनेत मोठ्या वाहनातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. वाहन बिघडल्यानंतर भर रस्त्यात उभे केल्याने त्या वाहनांना धडकून देखील काही अपघात झाले आहेत. एकंदरीत वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

वर्षभरात झालेले प्राणांतिक अपघात –
जानेवारी – 37
फेब्रुवारी – 26
मार्च – 24
एप्रिल – 14
मे – 20
जून – 27
जुलै – 30
ऑगस्ट – 27
सप्टेंबर – 26
ऑक्टोबर – 29
नोव्हेंबर – 27
डिसेंबर – 28

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.