BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चेन्नईतून पाठविल्या जात होत्या ‘त्या’ बनावट नोटा

आत्तापर्यंत 5 आरोपीं अटक; 4 लाखांच्या बनावट नोटा जप्त, पुण्यातील रहिवाशी असलेला व्यंकटेश मुदलियार सराईत गुन्हेगार

एमपीसी न्यूज – बनावट चलनी नोटा तयार करून त्या वटविणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून साडेचार लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा मूळचा पुण्याचा असलेला चेन्नई येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पूरवत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4 लाख 29 हजार पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा आणि 21 हजार 410 रुपयांच्या रुपये किमतीचे नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.

राजेश चंद्रभान ढिलोड (वय 45,रा. सिद्धार्थनगर, नगर रोड), अलका रोहिदास क्षीरसागर (वय 40 रा. भाजी मार्केट चौक, ताडीवाला रोड), आनंद यशवंत जाधव (वय 36, रा. मुळेवाडी, आंबेगाव), सुनिता आनंद जाधव (वय 30, रा. मुळेवाडी, आंबेगाव) आणि वेंकटेश मुदलियार (वय 44, रा.पेरियापालम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 8 जानेवारीला ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळे समोर बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी आलेल्‍या एका संशयित जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 67 हजार रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या.

पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास करून या गुन्ह्यातील आणखी एका दाम्पत्याला 12 जानेवारीला अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता या बनावट नोटा चेन्नई येथील व्यंकटेश मुदलियार नावाचा इसम छापत असून त्या नोटा पुरवण्याचे काम तो करत असल्याचे समजले.

पोलिसांनी एक पथक चेन्नई येथे रवाना करून त्यांनी नोटा पुरवणाऱ्या आरोपीला रात्री छापा टाकून अटक केली. त्याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी तेथे बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच 2000, 500, 200 आणि 50च्या तब्बल 2 लाख 35 हजार 410 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

व्यंकटेशवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न
अटक केलेला आरोपी व्यंकटेश हा मूळचा पुण्यातील असून त्याच्यावर खून, मारामारी, चोरी, अग्नी शस्त्र बाळगणे, फायरिंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. 2001 मध्ये झालेल्या पत्रकाराच्या खून प्रकरणात देखील त्याला अटक झाली होती. कोर्टाने त्याच्याविरुद्ध गैरजमानती वॉरंट काढले असून ते प्रलंबित असल्याचे देखील समोर आले. व्यंकटेश याने तामिळनाडू येथे राहून पैसे कमावण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून बनावट चलनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला होता.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3