Pimpri : सायबर विभागामुळे कंपन्यांना पुन्हा मिळाले 50 लाख रुपये

एमपीसी न्यूज – चिनी कंपनीने बिल देण्यासाठी दिलेला बॅंक अकाऊंट क्रमांक बदलल्याचा मेल भारतीय कंपनीला आला. त्यावर पेमेंट केले असता कंपनीला ते मिळाले नसल्याचे समोर आले. चिनी कंपनीच्या नामसदृष्य मेल पाठवून भारतीय कंपनची 45 लाखांची फसवणूक केली. अशाच प्रकारे शहारातील अन्य एका कंपनीची पाच लाखांची फसवणूक केली होती. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने त्वरीत हालचाली करीत चोरीस गेलेली रक्‍कम संबंधित कंपन्यांना परत मिळवून दिली.

वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टींग एलएलपी या कंपनीने चीनमधील एका कंपनीकडून 24 ऑगस्ट 2019 रोजी एक उत्पादन खरेदी केले होते. या उत्पादनाचे बिल देण्यासाठी चिनी कंपनीकडून एक बॅंक खात्याचा क्रमांक देण्यात आला. मात्र थोड्याच वेळेत चिनी कंपनीच्या नाम सदृष्य आणखी एक मेल आला. त्यामध्ये बिल देण्यासाठीची बॅंक आणि खाते क्रमांक बदलण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार भारतीय कंपनीने बदललेल्या बॅंक खात्यावर 44 लाख 79 हजार 917 रूपये ट्रान्सफर केले. तसेच बिलाचे पैसे मिळाले का, याबाबत खात्री करण्यासाठी चिनी कंपनीकडे विचारणा केली. मात्र बिलाचे पैसे मिळाले नसल्याचे चिनी कंपनीने सांगितले.

यामुळे मित्तल प्रिसिजन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता चिनी कंपनीच्या नाम सदृष्य इ मेलवरून पाठविलेला बॅंक खाते क्रमांक इतर कोणाचा तरी असल्याचे लक्षात आले. यामुळे कंपनीने त्वरीत सायबर विभागाशी संपर्क साधला. सायबर सेलच्या अधिकाऱ्यानह मित्तल यांच्या आणि चिनी कंपनीच्या मेल आयडीचे सायबर ऍनालीसीस केले असता अर्जदार यांचे कंपनीचा मेल आयडी हॅक न होता विदेशातील कंपनीचा मेल आयडी हॅक झाल्याचे सायबर सेलच्या लक्षात आले. त्यामुळे तात्काळ यु.के. या देशातील बॅंकेसोबत ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून सदरच्या पैशांचा व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. त्यानंतर परदेशातील बॅंकेकडे पाठपुरावा करुन अर्जदार यांची फसवणूक झालेली 44 लाख 79 हजार 917 रुपये भारतीय कंपनीच्या बॅंक खात्यावर परत मिळविण्यात सायबर विभागाला यश आले.

त्याचप्रमाणे लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनीला त्यांचे विदेशातील रॉ मटेरीयल पुरवविणाऱ्या कंपनीचा मेल आला की , आमचे कंपनीशी संबंधीत दोन्ही मेल आयडी बंद झाले असून आपल्या कंपनीला काही रॉ मटेरियल लागत असल्यास आमच्या नवीन मेल आयडीवर मेल करा, असे मेलव्दारे कळविले होते. नंतर लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल या कंपनीने संबंधित विदेशातील कंपनीला रॉ मटेरियलची मागणी करताच सदर विदेशी कंपनीने अर्जदार यांना न्युयॉर्कमधील एका बॅंकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर पाच लाख 97 हजार 376 रुपये भरण्या सांगितले. त्यानुसार भारतीय कंपनीने दिलेल्या बॅंक खत्यावर पैसे भरले. पैसे भरल्यानंतर भारतीय कंपनीने काही दिवसांनी संबधीत विदेशी कंपनीला मटेरियल बाबत फोन केला असता परदेशातील त्या कंपनीने आम्हाला आपले कोणत्याही प्रकारचे पैसे मिळाले नसून आमच्या कंपनीचा कोणताही मेल आयडी बदली झाला नाही व आम्ही कोणत्याही बॅंकेच्या अकाऊंटला आपल्याला पैसे भरण्यास सांगितले नाही असे कळविले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.

साबयर सेलने परदेशातील बॅंकेत गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधित बॅंकेला तात्काळ पत्रव्यवहार व फोन करून सदरच्या पैश्‍याचा व्यवहार थांबविण्यास कळविले. यामुळे न्युयॉर्कमधील बॅंकेने लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनीची फसवणूक झालेली पाच लाख 97 हजार 376 रुपये पुन्हा कंपनीच्या खात्यात वर्ग केले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर आयुक्त रामनाथ पोकळे सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक निरीक्षक गरुड, उपनिरीक्षक निलेश बोडखे, स्वाती लामखडे, कर्मचारी मनोज राठोड, भास्कर भारती, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, नाजुका हुलवळे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.