Bhosari News: मागणीअभावी 48 गाळे धूळ खात

एमपीसी न्यूज – कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 64 गाळे धूळ खात पडून आहेत. यामध्ये सर्वाधिक 48 गाळे भोसरी मंडईतील तर इतर भागातील 16 गाळ्यांचा समावेश आहे. एकुण गाळ्यांपैकी निगडी, अंजठानगर येथील 33 व्यापारी गाळे वाटप करण्यायोग्य स्थितीत राहिले नाहीत. तर, 936 गाळ्यांपैकी 839 गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती महापालिका भूमी आणि जिंदगी विभागाने दिली.

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, रावेत, संभाजीनगर, सांगवी यासह आदी भागात महापालिकेचे 936 व्यापारी गाळे आहेत. यामध्ये भाजी मंडई, व्यापारी संकुले, उद्यान परिसरातील गाळ्यांचा समावेश आहे. यामधील काही गाळे हे बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर, काही गाळे आड बाजूला आहेत. त्यामुळे महापालिकेच्या काही गाळ्यांना मागणी असते. तर, काहींना नसते, मात्र त्यानंतरही भूमी आणि जिंदगी विभागाने रखडलेले गाळे वितरित करण्यासाठी जाहिराती दिल्या. मागेल त्याला गाळा ही संकल्पणा राबविली.

त्यामुळेच 936 गाळ्यांपैकी 839 गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहेत. दुसरीकडे वारंवार अर्ज मागवूनही भोसरी भाजी मंडई येथील पहिल्या मजल्यावरील 22 आणि दुसऱ्या मजल्यावरील 26 अशा 48 गाळ्यांसह इतर भागातील 16 अशा 64 गाळे धूळखात पडून आहेत. आकुर्डी येथील पांडुरंग काळभोर सभागृह येथील 21 आणि अंजठानगर येथील 12 अशा 33 गाळ्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे गाळे वितरणा योग्यच नसल्याचे भूमी आणि जिंदगी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे वारंवार अर्ज मागवूनही काही भागातील व्यापारी गाळ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने दुरावस्था झालेल्या गाळ्यांची दुरूस्ती करावी की नाही असा पेच पालिका प्रशासनाला पडला आहे.

6 कोटी 14 लाखांचे उत्पन्न
महापालिकेच्या वतीने शहरातील गाळे तात्पुरते, भाडेकराराने, लिलावाने वितरण केले जाते. काही गाळे 5 ते 10 वर्षे करानामा करून मासिक भाडे या तत्वावर वितरित केले आहेत. यामधून महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाला 6 कोटी 14 लाख 45 हजार 749 रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर 1 कोटी 22 लाख 97 हजार रूपये गाळेधारकांकडून येणे बाकी आहेत.

भूमी आणि जिंदगी विभागाच्या ताब्यात असलेल्या गाळ्यांचे वितरण करण्यासाठी सातत्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु असते. तात्पुरते, भाडेकराराने, लिलावाने गाळ्यांचे वितरण केले जाते. गेल्या वर्षभरात जास्तीत-जास्त गाळे वितरित कसे होतील, यासाठी मागेल त्याला व्यापारी गाळा ही संकल्पना राबविली. याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.