Chikhli : ठेकेदारांनी बिले न दिल्याने घरकुल प्रकल्पाचे काम ठप्प

उपठेकेदारांनी कामे थांबवली मुख्य दोन ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी  न्यूज –  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे काम गेल्या अकरा वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आणखी दहा इमारती उभारणे बाकी आहे. परंतु, प्रकल्पाचे काम करणाऱ्या मुख्य ठेकेदार कंपनीने प्रकल्पाच्या इतर कामांसाठी नेमलेल्या उपठेकेदारांची बिले गेल्या आठ-दहा महिन्यांपासून दिले नसल्यामुळे त्यांनी आपले काम बंद ठेवले आहे. त्यामुळे एक आठवड्यापासून संपूर्ण प्रकल्पाचे काम ठप्प झाले असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आम्ही काहीही करू शकत नसल्याचे सांगत आपले हात वर केले आहे. उपठेकेदारांनी मुख्य दोन ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे स्वस्त घरकुल प्रकल्प रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

याप्रकरणी उपठेकेदारांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलिसांकडे प्रकल्पाचे काम करणाऱ्या दोन मुख्य ठेकेदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता आयुक्त आणि पोलिस यावर काय तोडगा काढतात त्यावरच या प्रकल्पाच्या उर्वरित कामाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. महापालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत स्वस्त घरकुल प्रकल्पाला मंजुरी मिळवून आणली. अवघ्या दीड लाखात घर देण्याचे आश्वासन देण्यात आले. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवून महापालिका प्रशासनाने प्राधिकरणाच्या जागेत स्वस्त घरकुल प्रकल्प बेकायदेशीरपणे रेटण्याचा प्रयत्न केला. जागेचा ताबा नसणे आणि अनेक प्रशासकीय चुकांमुळे या प्रकल्पाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. प्रशासकीय चुकांमुळे या प्रकल्पातील घरांच्या किंमतीतही वाढ करावी लागली.
या प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे काम नाशिक पवार पाटकर अॅण्ड डी. एस. कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदार कंपनीला देण्यात आले. ही ठेकेदार कंपनी २००७ पासून चिखली येथे या प्रकल्पाचे बांधकाम करत आहे. या मुख्य ठेकेदार कंपनीने प्रकल्पाच्या इतर अनेक कामांसाठी उपठेकेदार नेमले आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे बिल ही ठेकेदार कंपनी अदा करते. परंतु, कालांतराने पवार पाटकर या ठेकेदार कंपनीने प्रकल्पाचे संपूर्ण काम नाशिक येथील सिल्वर ओक कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला दिले. त्याबाबत या दोन्ही ठेकेदार कंपन्यांमध्ये करार करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाची इतर कामे करणाऱ्या उपठेकेदारांना त्यांच्या कामाचे बिल सिल्वर ओक कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड हा ठेकेदाराने देण्यास सुरूवात केली.
परंतु, मुख्य ठेकेदार बनलेल्या सिल्वर ओक ठेकेदार कंपनीने गेल्या आठ-दहा महिन्यांपासून उपठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामांचे बिल अदा केलेले नाही. या उपठेकेदारांनी अनेकदा भेट घेऊन बिलांची मागणी केली असता ठेकेदार कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर उपठेकेदारांनी या प्रकल्पाची जबाबदारी असलेले सहशहर अभियंता राजन पाटील यांची भेट घेऊन ठेकेदार कंपनीकडून बिले घेऊन देण्याची मागणी केली. परंतु, राजन पाटील यांनी या प्रकरणात प्रशासन काहीही करू शकत नसल्याचे सांगून हात वर केले. त्यामुळे उपठेकेदारांनी आपापली कामे बंद ठेवली आहे. परिणामी घरकुल प्रकल्पाचे काम गेल्या आठवडाभरापासून पूर्णपणे ठप्प झाले आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण १६२ इमारती उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील १० इमारतींची उभारणी अद्याप झालेली नाही. या प्रकल्पासाठी पात्र ठरलेले गोरगरीब लाभार्थी गेल्या अकरा वर्षापासून स्वप्नाचे घर मिळेल या आशेने प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमतामुळे या प्रकल्पाला उशीर होत आहे. आता उपठेकेदारांनी काम बंद केल्याने प्रकल्पाचे संपूर्ण काम ठप्प होऊन प्रकल्पाला आणखी विलंब लागणार आहे. या प्रकरणातून महापालिकेचे ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता उपठेकेदारांनी मुख्य ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.