Baramati : केंद्राच्या आणि राज्याच्या विकासामुळे आपला महाराष्ट्र बदलतो आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – गेल्या पंधरा वर्षात आघाडीच्या काळाच्या पेक्षा तिप्पट विकास आमच्या युती सरकारने पाच वर्षामध्ये केले आहे. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. यासाठी महाजनादेश याञा घेऊन आम्ही आपणाकडे आलो आहोत. दोन हजार एकवीस-बावीस सालापर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. विकासामुळेच देश व राज्य आज बदलतो आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत व्यक्त केला.

महाजनादेश याञेच्या माध्यमातून फङणवीस बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात आले होते. शहरातील तीन हत्ती चौकात जाहीर भाषणात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे खासदार अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

देशातील खरा इतिहास हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घडवला आहे. ३७० वे कलम रद्द करुन अखंड भारतच घडवला. पंधरा ऑगस्ट रोजी देशाचा तिरंगा जम्मू काश्मीरमध्ये फडकला. यावर मतदान घेतले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र मतदान केले नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील गळती थांबता थांबत नाही. आजच सकाळी उदयनराजे भोसले यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. आता सातारा व पुणे जिल्ह्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहात नाही, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. “बुरे काम का बुरा नतिजा क्यु भाई चाचा हा भतिजा ” अशी गत या नेते मंडळींची झाली आहे, असा टोला ही फडणवीस यांनी पवारांचे नाव न घेता लगावला.

सिंचनाची कामे अपुरे होती ती पूर्ण होत आहे नवनवीन प्रकल्पासाठी निधी दिला जात आहे. यामुळेच विकासाला गती मिळत आहे.गरजू व गरीबांच्या साठी घरकुल योजना, तसेच गरजूंना पाणी गॅस विज कनेक्शन दिल्याने जनतेचा विश्वास सरकारवर बसला आहे. बारामतीमध्ये ध्वनीक्षेपण कार्यासाठी येथिल काही व्यक्तींनी हरकत घेतल्याचे मी ऐकले. आता बारामतीमध्ये सुद्धी परिवर्तन होणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, माझा आवाज आता कुणी ही दाबू शकत नाही. आता निवडणुकीत परिवर्तन घडल्याशिवाय रहाणार नाही. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगांव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे,  ज्येष्ठ संचालकतज्ज्ञ चंद्रराव तावरे, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे, भाजपचे अविनाश मोटे, दिलीप खैरे, प्रशांत सातव आदी उपस्थित होते.

अजित पवार समर्थकांच्या घोषणांमुळे तणाव

पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार समर्थकांनी “एकच वादा अजित दादा” च्या घोषणा दिल्याने सभा परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौरानिमित्ताने रस्तावरील अनेक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like