BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : वाकड पोलिसांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षांनी आईच्या कुशीत परतली चार वर्षाची चिमुकली

उच्च न्यायालयाकडून वाकड पोलीस आणि आयुक्तांचे कौतुक

एमपीसी न्यूज – मुलगी दोन वर्षांची असताना आईच्या ताब्यातून जबरदस्तीने हिसकावून वडील पसार झाले. आईने पोलिसात तक्रार करूनही फायदा झाला नाही. मुलीच्या ताब्यासाठी आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलीला उत्तराखंड येथून वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल दोन वर्षांनी मुलगी आईच्या कुशीत विसावली. याबाबत उच्च न्यायालयाने वाकड पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांचे कौतुक केले.

रहाटणी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद झाले. 2017 मध्ये वडिलांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आईच्या ताब्यातून हिसकावून घेतले. याबाबत पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, मुलांचा ताबा कोणाकडे असावा, याबाबत पोलीस निर्णय घेऊ शकत नसल्याने हे प्रकरण दप्तरी दाखल केले. आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे द्यावा, यासाठी आईने मे 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने वेळोवेळी पती आणि त्यांच्या नातेवाइकाला न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स काढले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे न्यायालयाने मुलीला शोधून काढून आपल्यासमोर हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी मुलीच्या वडिलांची माहिती घेतली असता ते कोलकता येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोनवेळा पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, पोलीस आल्याची कुणकूण लागताच मुलीच्या वडिलांनी तिथून पोबारा केला.

अखेर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे आणि त्यांचे पथक 22 एप्रिल रोजी कोलकता येथे गेले. मात्र यावेळीही पोलीस आल्याची कुणकूण लागल्याने मुलीचे वडील मुलीला घेऊन रूषीकेश येथील आश्रमात गेले. पोलिसांनी तेथील माहिती काढून मुलगी आणि तिच्या वडिलांना 27 एप्रिल रोजी ताब्यात घेतले. 30 एप्रिल रोजी मुलगी आणि तिच्या वडिलांना मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने मुलीला आईच्या ताब्यात देण्यास सांगितले. यामुळे तब्बल दोन वर्षांनी मुलगी आईच्या कुशीत विसावली. वाकड पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासासाठी पोलीस आयुक्तांनी बक्षीस द्यावे, असे पत्र उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहे.

वाकड पोलिसांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.वडिलांचा ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा; व्हिडिओ कॉलिंगद्वारे आईकडून मुलीची ओळख पोलिसांनी रूषीकेश येथे मुलगी आणि वडिलांना ताब्यात घेतले.

मात्र वडिलांनी ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला. यामुळे काहीकाळ पोलीसही बुचकळ्यात पडले. अखेर पोलिसांनी मुलीच्या आईला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी आईने ती मुलगी आपलीच असल्याचे सांगितले. तसेच पतीचीही ओळख पटविली.

HB_POST_END_FTR-A2

.