Raigad Taliye landslide : यामुळे कारणामुळे तळीये ग्रामस्थांनी बचाव मोहिम थांबवण्याची केली विंनती, प्रशासनाने मोहीम थांबवली

एमपीसी न्यूज: गेल्या चार दिवसांपासून महाड येथील तळीये गावात दरड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून बचावमोहिम राबवण्यात आली. मात्र ग्रामस्थांच्या विनंतीनंतर बचाव मोहिम थांबवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. रविवारी दिवसभरात 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांसह तळीये गावचे सरपंच आणि स्थानिक आमदारांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केली. त्यांनी म्हटलं की, मृतदेह काढत असताना त्यांची विटंबना होतेय. मृतदेहांचे हात-पाय असे विविध अवयव निखळून येताहेत. या ठिकाणी खूपच खोल चिखल आहे. चार ते सहा फूट खोदल्यानंतर मृतदेह सापडत आहेत, अशा वेळी मृतदेहांची दुरावस्था झालेली असते म्हणून मृतदेहांची विटंबना होऊ नये यासाठी ही शोध मोहिम थांबवण्यात यावी, असं निधी चौधरी यांनी सांगितलं.

तसेच जे बेपत्ता लोक आहेत त्यांना मृत घोषित करण्यात यावं आणि त्याच ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यात यावी, अशी मागणीही तळीयेतल्या ग्रामस्थांनी केली असल्याचं जिल्हाधिकारी चौधरी यांनी म्हटलं.

ग्रामस्थांनी प्रशासनाला ही बचाव मोहिम थांबवण्यात यावी अशी विनंती केली. आत्तापर्यंत 48 ते 72 तास झाले तरी कोणीही जिवंत सापडलेलं नाही आहे. आमच्या कुटुंबातील लोक या दुर्घटनेत मृत्यू पावलेत त्यामुळं आम्ही ग्रामस्थ त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करताना त्यांच्या शरीराची विटंबना होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.