Nigdi : खोदलेले रस्ते बुजवले, पण राडारोडा तसाच; राडारोड्यात घसरून दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – विविध कामांसाठी उन्हाळ्यात शहरातील रस्ते उकळले जातात. त्यामध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टची कामे केली जातात. प्रशासनाकडून खोदलेले रस्ते बुजवले. रस्त्यात पडलेला राडारोड्याकडे मात्र प्रशासनाने पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. आज (गुरुवारी) या राडारोड्यात घसरून एक दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना यमुनानगरमधील मेघदूत चौकात घडली.

पिंपरी-चिंचवड शहरात विविध कामांसाठी सगळीकडे रस्त्यांची खोदाई केली. अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली. रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्कील झाले. खोदाई केल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या बुजविले नाहीत. याचा नागरिकांना नाहक त्रास झाला. खोदलेल्या रस्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले. त्यानंतर प्रशासनाने कसेबसे खड्डे बुजवले. पण आजूबाजूला पडलेला राडारोडा मात्र तसाच ठेवला.

प्रशासन करत असलेल्या हलगर्जीपणामुळे शहरात विशेषतः निगडी, यमुनानगर भागात राडारोड्यात घसरून अनेक अपघात झाले. गुरुवारी मेघदूत चौकात पडलेल्या राडारोड्यात घसरून एक दुचाकीस्वार जखमी झाला. असे अनेक अपघात दररोज होत आहेत. मात्र, याकडे प्रशासन लक्ष देत नाही. खोदलेले रस्ते अथवा पडलेल्या राडारोड्यात अडकून एखादा बळी गेल्याशिवाय प्रशासनाला जात येणार नाही का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.