Pune : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये घाणीचे साम्राज्य  !

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एफसी रोडवरच्या रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलक ही पुण्यात अत्यंत लोकप्रिय असणारी हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत आढळून आलं आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातल्या लोकप्रिय हॉटेल्सचा ढिसाळ आणि गलिच्छ कारभार समोर आलाय. या हॉटेलमधल्या किचनमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आढळून आलं. तसंच, या हॉटेलमध्ये शिळे पदार्थ वापरले जात असल्याचंही समोर आलंय.

फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या वैशाली हॉटेलच्या किचनमध्ये सर्वत्र कचऱ्याचेच साम्राज्य होते. अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही अस्वच्छ असल्याचं निदर्शनास आलं. तसंच फ्रीझरही बरेच दिवस साफ केलं नसल्याचं आढळून आलं. इथे स्वयंपाक करणारे शेफही स्वच्छतेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे बरेच दिवस किचनमध्ये पेस्ट कंट्रोलही झालं नसल्याचं उघड झालं.
एफडीएने दिलेले कोणतेही स्वच्छतेचे सर्टिफीकेट हॉटेलकडे नव्हते. कॅफे गुडलकमधील किचनही अस्वच्छ होतं. याना सिझलर्समध्ये स्वयंपाक्यांसाठी कपडे बदलण्यासाठी वेगळी रूमही नसल्याचं समोर आलं. या सर्व हॉटेलांना एफडीएने सध्या कारणे दाखवा नोटीस दिली आहे. पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.