Pimpri Crime News : विनामास्क कारवाई करताना पोलिसाच्या डोक्यात हाणले दांडके, नोकरी घालवण्याचीही दिली धमकी    

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर फिरताना मास्क घालणं बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करणा-या पोलिसाला शिवीगाळ करून त्याच्या कपाळावर दांडके मारले तसेच, पावती पुस्तक हिसकावून नोकरी घालवण्याचीही धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मोरवाडी, पिंपरी या ठिकाणी शुक्रवारी (दि. 30) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. 

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. रामदास सोपान लुकर (वय 65, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) व सतीश पवार (वय 40, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई मोरवाडी याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या आरोपींवर कारवाई करत असताना आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली तसेच, धक्काबुक्की करून पावती पुस्तक हिसकावून घेतले. एवढेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादी यांना चक्क नोकरी घालवण्याचीही धमकी दिली.

आरोपींना चौकशीसाठी पोलीस चौकीत घेऊन जात असताना आरोपी सतीश पवार हा पळून गेला. तर, आरोपी रामदास याने लाकडी दांडके फिर्यादी यांच्या कपाळावर मारले. अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.